व्यापाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर केली सकारात्मक चर्चा
टोल भूमिकेबद्दल ना. नितेश राणे यांचे मानले आभार
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी पालकमंत्री ना. नितेश राणे यांची भेट घेतली. यावेळी व्यापारी वर्गाच्या विविध समस्या, अडचणी तसेच जिल्ह्यातील व्यापार आणि उद्योगवृद्धीच्या दृष्टीने आवश्यक बाबींवर चर्चा करण्यात आली.
या भेटीदरम्यान व्यापारी महासंघाच्या प्रतिनिधींनी टोल संदर्भात घेतलेल्या भूमिकेबद्दल ना. नितेश राणे यांचे आभार मानले. व्यापाऱ्यांच्या हितासाठी भविष्यातही सहकार्य मिळावे, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यापार क्षेत्राला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधा, बाजारपेठ विस्तार, नवउद्योजकांना प्रोत्साहन, रोजगारनिर्मिती तसेच उद्योग क्षेत्रासाठी उपलब्ध संधी यावरही सकारात्मक विचारविनिमय झाला. व्यापाऱ्यांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे तोडगा काढण्यासाठी समन्वयाने काम करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.
यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय सावंत, कार्यवाह राजू जठार, माजी अध्यक्ष द्वारकानाथ घूर्ये, सहकार्यवाह राजन नाईक, उपाध्यक्ष भोगले, उपाध्यक्ष अवधूत शिरसाट, उपाध्यक्ष पुंडलीक दळवी, कुडाळ तालुका अध्यक्ष पी. डी. शिरसाट, सावंतवाडी तालुका अध्यक्ष जगदीश मांजरेकर, विजय केनवडेकर, संतोष नानचे, प्रकाश वाळके, हर्षल बांदेकर, राजेंद्र पिसे आदी पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.













