चिपळूण (वार्ताहर) : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा कापरे देऊळवाडा येथे शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार माजी विद्यार्थी संघाची उत्साहपूर्ण वातावरणात स्थापना करण्यात आली. या उपक्रमामुळे शाळेच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी उपस्थित माजी विद्यार्थ्यांमधून श्रीमती आरती भुर्के यांची अध्यक्षपदी तर सीताराम भैरवकर यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. सचिव म्हणून मुख्याध्यापिका मानसी महाडीक यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून, कोषाध्यक्षपदी राजेंद्र राऊत यांची निवड झाली. याशिवाय सेवानिवृत्त शिक्षक सदस्य बळीराम मोरे, निवृत्त सेवा अधिकारी सदस्य सुरेश मोरे तसेच सदस्य म्हणून शैलेश मोरे आणि दत्ताराम नलावडे यांची निवड करण्यात आली. या सर्व निवडीतून शाळेच्या प्रगतीसाठी एक मजबूत आणि समर्पित टीम तयार झाली आहे. विशेष म्हणजे, शैक्षणिक व सामाजिक कार्याची आवड असलेल्या प्रत्येक वाडीतील अध्यक्ष किंवा वाडीप्रमुख आणि इतर दोन सदस्यांना या संघात सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे. यासाठी मुख्याध्यापकांच्या वतीने संबंधित वाडीप्रमुखांना पत्र देऊन सदस्यांची नावे कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आशिष गंगाराम मोरे आणि नवनिर्वाचित अध्यक्ष आरती भुर्के यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांना संघाचे सभासद होऊन शाळेच्या शैक्षणिक व सामाजिक उन्नतीसाठी सक्रिय सहकार्य करण्याचे आवाहन केले. या माजी विद्यार्थी संघाच्या स्थापनेमुळे शाळेच्या विकासाला गती मिळून विद्यार्थ्यांसाठी नवे संधीद्वार खुले होणार आहे.











