चिपळूण नगरपरिषद नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण आरक्षण; इच्छुकांची भाऊगर्दी

महायुती- महाविकास आघाडी की स्वतंत्रपणे पक्ष आमने-सामने?
चिपळूण (प्रतिनिधी) : सुमारे गेल्या तीन वर्षांपासून प्रशासक असलेल्या चिपळूण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण आरक्षण पडले असून या पदासाठी इच्छुकांची भाऊ गर्दी देखील असल्याचे समोर आले आहे. चिपळूण नगरपरिषदेच्या इतिहासात यंदा तिसऱ्यांदा थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक होत असून या निवडणुकीत महायुती की महाविकास आघाडी द्वारे निवडणुका लढविल्या जातील की पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरतील, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून नगरपरिषदांच्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाच्या सोडतीकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. ही उत्कंठा नुकतीच संपली असून सोमवारी मुंबई येथील मंत्रालयात नगराध्यक्ष पदांसाठीचे आरक्षण जाहीर झाले आहे. यामध्ये चिपळूण नगर परिषदेसाठी सर्वसाधारण आरक्षण पडल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या इच्छुकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. सुमारे गेल्या तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात झालेल्या राजकीय स्थित्यंतरांमध्ये महायुतीमध्ये भाजपा, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेस यांचा समावेश असून चिपळूणमध्ये देखील महायुती व महाविकास आघाडी भक्कम असल्याचे चित्र आहे. महायुतीतील भाजपकडून मंगेश उर्फ बाबू तांबे, विजय चितळे, शशिकांत मोदी, आशिष खातू, परिमल भोसले तर शिवसेना शिंदे गटाकडून उमेश सकपाळ, सुधीर शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून मिलींद कापडी यांची नावे चर्चेत आहेत. तसेच महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे माजी आमदार रमेश कदम, शिवसेना उबाठाकडून बाळा कदम, काँग्रेसकडून लियाकत शाह यांची नावे चर्चेत आहेत.
त्याचबरोबर सर्वसाधारण आरक्षण असल्याने महिला देखील निवडणूक रिंगणात येऊ शकतात. महिला इच्छुक उमेदवारांचीदेखील मोठी यादी आहे. यामुळे महायुती व महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी मिळते याकडे सर्वांचे लक्ष असून तत्पूर्वीही निवडणूक महायुती व महाविकास आघाडी म्हणून लढविल्या जाणार का? की स्वतंत्रपणे पक्ष निवडणूक रिंगणात येणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.