पैसे दिले नाही म्हणून कुलदीपकाने वडिलांना मारहाण करत दुसऱ्या मजल्यावरून पाडले खाली

जखमी अवस्थेत एक रात्र काढल्यानंतर वडील रुग्णालयात दाखल 

रत्नागिरी : प्रतिनिधी
शहरातील कुवारबाव येथे माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना घडली. खर्चासाठी मागितलेले पैसे दिले नाहीत या रागातून मुलाने आपल्या वडिलांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. या झटापटीत वडील पडक्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रणय मनोज सणस (2१, रा. कुवारबाव, रत्नागिरी) असे धक्काबुक्की करणाऱ्या मुलाचे नाव आहे. ही घटना शनिवार २५ एप्रिल रोजी सायंकाळी 5 वा.सुमारास कुवारबाव येथील संगम हॉटेलच्या मागील पडक्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर घडली. फिर्यादी मनोज प्रभाकर सणस (५३, रा. वाई, सातारा, सध्या रा. कुवारबांव) हे कुकिंगचा व्यवसाय करतात. शनिवारी सायंकाळी ते व मुलगा प्रणय सणस हे कुवारबांव येथील संगम हॉटेलच्या मागील एका पडक्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर बसले होते. त्यावेळी मुलगा प्रणय याने वडिलांकडे खर्चासाठी २००० रुपयांची मागणी केली. वडिलांनी “माझ्याकडे एवढे पैसे नाहीत, मी फक्त २०० रुपये देऊ शकतो” असे सांगितले. आपल्या मागणीपेक्षा कमी पैसे मिळत असल्याचा राग आल्याने प्रणयचा संयम सुटला. पैसे देण्यास नकार दिल्याने प्रणयने वडिलांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि तो त्यांच्या अंगावर धावून गेला. त्याने केलेल्या धक्काबुक्कीमुळे मनोज सणस यांचा तोल गेला आणि ते पडक्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून थेट जमिनीवर पडले.

या भीषण अपघातात त्यांच्या शरिराला गंभीर दुखापत झाली. दुसऱ्या मजल्यावरून पडल्यानंतर जखमी मनोज सणस रात्रभर तिथेच पडून होते. दुसऱ्या दिवशी रविवार २६ एप्रिल रोजी यांनी आपले मित्र दीपक घाटगे यांना बोलावून घेतले. त्यानंतर १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रुग्णालयात उपचार सुरू असताना पोलिसांनी मनोज सणस यांचा जबाब नोंदवून घेतला. अधिक तपास शहर पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार पी. के. पाटील करत आहेत.