दोडामार्ग :शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमध्ये शिवकालीन मर्दानी खेळांची ओळख व्हावी या दृष्टीने शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य विक्रांत विकासभाई सावंत यांच्या संकल्पनेतून व श्री शंभो छत्रपती मर्दानी आखाडा वंदूर कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित शिवकालीन मर्दानी खेळांचे प्रशिक्षण शिबिर दिनांक २४ एप्रिल ते २८ एप्रिल या कालावधीत दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज दोडामार्ग प्रांगणात संपन्न झाले. या शिबिरामध्ये शाळेमध्ये शिकत असलेले व तालुक्यातील इतर विद्यार्थी असे एकूण ५० प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. या पाच दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थ्यांना लाठीकाठी, तलवारबाजी व आत्मसंरक्षण याचे परिपूर्ण असे मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रशिक्षण शिबिरासाठी उपस्थित विद्यार्थ्यांना अध्यक्ष विक्रांत विकासभाई सावंत, दोडामार्ग मधील सामाजिक कार्यकर्ते गणेश गावडे, पालक गणेश ठाकूर व सोमनाथ नाईक, धाकू वरक, मुख्याध्यापक संजय पाटील यांच्याकडून पूरक आहारही देण्यात आला.
या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी पालक सोमनाथ नाईक यांनी प्रशिक्षकांचे शाल श्रीफळ व पेन देऊन आभार मानले. या प्रशिक्षणासाठीचा सर्व आर्थिक भार संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष विक्रांत विकासभाई सावंत यांनी उचलला होता. या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिवकालीन युद्धकलेचे प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळाल्याने पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.









