सावंतवाडी:सावंतवाडी पोलीस ठाणे हद्दीत काल तारीख २७ रोजी सायंकाळी ६ ते रात्री ११ वाजताच्या दरम्यान पोलिसांनी अवैध दारूविक्रीवर मोठी कारवाई केली आहे. या मोहिमेत पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून हजारो रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे.
या कारवाईबाबत अधिक माहिती अशी की, सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास कोलगाव कुंभयाळ वाडी येथे पोलिसांनी छापा टाकला. यावेळी रवींद्र लक्ष्मण राऊळ (वय ४९) याच्या ताब्यातून १०,१००/- रुपये किमतीच्या सुमारे १०० बेकायदेशीर दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. त्यानंतर रात्री पावणे आठ वाजता माझगाव ख्रिश्चनवाडी येथे दुसरी कारवाई करण्यात आली. यामध्ये लुईस अंतोन देसा (वय ६१) याच्या ताब्यातून १,९००/- रुपये किमतीच्या एकूण १९ बेकायदेशीर दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. तिसरी कारवाई कलंबिस्त ख्रिश्चनवाडी येथे झाली असून, तिथे झूजे मोतेस रोड्रिक्स (वय ६७) याच्या ताब्यातून ४,१००/- रुपये किमतीच्या विविध प्रकारच्या १८ बेकायदेशीर दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.
या धडक मोहिमेत रात्री उशिरा तिघांवरही गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर सावंत, हवालदार प्रकाश कदम तसेच सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक श्रीमती मुळीक, हवालदार मनोज राऊत, अमित राऊळ, दीपक शिंदे आणि धोत्रे यांनी संयुक्तपणे यशस्वी केली. अचानक झालेल्या या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.












