सिंधुदुर्ग ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत ५२.९९ टक्के मतदान

१४ ग्रामपंचायतींतील ६७५३ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

मतदान प्रक्रिया शांततेत; उद्या सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील सदस्य व थेट सरपंच पदांच्या रिक्त जागांसाठी सोमवारी पार पडलेल्या पोटनिवडणुकीत जिल्हाभरात सरासरी ५२.९९ टक्के मतदानाची नोंद झाली. एकूण १४ ग्रामपंचायतींमधील १२ हजार ७४३ मतदारांपैकी ६ हजार ७५३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतींमध्ये प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडली. थेट सरपंच पदासाठी ५ ग्रामपंचायतींमध्ये ११ उमेदवार रिंगणात असून सदस्य पदाच्या पोटनिवडणुकीसाठी ९ ग्रामपंचायतींमध्ये २३ उमेदवारांमध्ये लढत होत आहे. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान शांततेत पार पडल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने दिली.

थेट सरपंच पदासाठी कणकवली तालुक्यातील घोणसरी येथे ५२.९४ टक्के, मालवणमधील चौके येथे ५७.६० टक्के, कुडाळमधील कालेली येथे ५९.५१ टक्के आणि सावंतवाडीतील माजगाव येथे ४०.१२ टक्के मतदान झाले.

सदस्य पदाच्या निवडणुकीत कणकवलीतील दारिस्ते येथे ६१.७१ टक्के, तळेरे येथे ५९.१४ टक्के, मालवणमधील धामापूर येथे ५९.०६ टक्के, वराड येथे ७५.७३ टक्के, कुडाळमधील गावराई येथे ५३.९४ टक्के, चेंदवण येथे ५७.२२ टक्के, रानबांबुळी येथे ६४.२६ टक्के, वेंगुर्ल्यातील मठ येथे ६१.२४ टक्के तर सावंतवाडीतील नाणोस येथे ५६.४९ टक्के मतदानाची नोंद झाली.

मतदान प्रक्रियेदरम्यान कुठेही मतदान यंत्र बदलण्याची वेळ आली नाही तसेच कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. जिल्ह्यात सर्वत्र शांततेत व भयमुक्त वातावरणात मतदान पार पडल्याने जिल्हा प्रशासनाने मतदारांचे आभार मानले आहेत.

दरम्यान, या पोटनिवडणुकांची मतमोजणी २९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजल्यापासून संबंधित तहसीलदार कार्यालयात होणार आहे.