अवघ्या सात मतांनी निसटता विजय
लांजा (प्रतिनिधी) :भडे ग्रामपंचायतीच्या पोट
निवडणुकीमध्ये सरपंच पदी वृषाली रवींद्र लोखंडे या विजयी झाल्या. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा अवघ्या सात मतांनी पराभव केला.
दरम्यान, निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊनही ग्रामपंचायत सदस्य पदासाठी अनुत्सुकता
दाखवत उमेदवारी अर्ज न भरल्याने ७ ग्रामपंचायत मधील दहा सदस्य पदे पुन्हा एकदा रिक्त राहणार आहेत.
तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या ग्रामपंचायत सदस्य जागांसाठी आणि भडे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदा साठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. या १३ ग्रामपंचायतींपैकी वेरळ, शिरवली, आगवे, पुनस आणि कोर्ले या पाच ग्रामपंचायतीमधील नऊ ग्रामपंचायत सदस्य हे प्रत्यक्ष निवडणुकी पूर्वीच बिनविरोध निवडून आले होते . तर कुरचुंब, वाघ्रट, बेनी खुर्द, आगवे, खावडी, कोट आणि वेरवली खुर्द या सात ग्रामपंचायत मधील १० ग्रामपंचायत सदस्यांसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने या जागा रिक्त राहिले आहेत. तर उर्वरित भडे ग्रामपंचायतच्या सरपंच पद आणि चार ग्रामपंचायत सदस्य अशा पाच जागांसाठी मंगळवारी २८ एप्रिल रोजी मतदान झाले होते.
मतदान झालेल्या भडे ग्राम पंचायतीच्या सरपंच पद आणि ग्रामपंचायत सदस्य पदांचा निकाल
आज बुधवारी २९ एप्रिल रोजी सकाळी लांजा तहसील कार्यालय येथे जाहीर करण्यात आला. सरपंच पदासाठी तिरंगी लढत होऊन वृषाली रवींद्र लोखंडे या १९१ मते घेत विजय झाल्या. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार मयुरी प्रमोद आडविलकर (१८५ मते), आणि दिया रुपेश रेवाळे यांना (१३८ मते) मिळाली. नोटा २१ मते.
त्याचप्रमाणे भडे ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक १ आणि ४ मधील चार जागांसाठी पोट निवडणुक झाली. यामध्ये ओबीसी असलेल्या प्रभाग क्रमांक १ मधून संजीव कुमार भरत राऊत (११७ मते) विजय झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार संजय वासुदेव रेवाळे (१०१ मते) आणि संजय जनार्दन सुर्वे (६४ मते) मिळाली. याच प्रभाग क्रमांक १ मधील सर्वसाधारण स्त्री साठी राखीव असलेल्या सोनाली सुजय दळवी या १४८ मते घेऊन विजय झाल्या. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार रसिका राजेश मयेकर १३५ मते, पूजा प्रकाश गीतये ११३ मते आणि मयुरी ओमकार घाणेकर १११ मते. प्रभाग क्रमांक ३ मधून पूजा प्रकाश गीतये या ८७ मते घेऊन विजयी झाल्या. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार स्वाती सुधीर पाटील यांना २५ मते मिळाली.












