दापोली (विशेष प्रतिनिधी) – दापोली तालुक्यातील मांदिवली येथील उर्दू शाळेजवळ शाळा सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत बॉक्साईट वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली जाते, अशी माहिती मानव अधिकार आयोगाच्या आदेशानुसार झालेल्या चौकशीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी दिली होती. मात्र, आज समोर आलेल्या व्हिडिओमुळे प्रत्यक्ष परिस्थिती याच्या पूर्णपणे विरुद्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे.
व्हिडिओमध्ये शाळा सुरू होत असतानाच बॉक्साईटची वाहतूक सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मोठ्या वाहनांची सततची ये-जा, उडणारी धूळ आणि वाढता आवाज यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
मानव अधिकार आयोगाच्या चौकशीवेळी अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती आणि प्रत्यक्ष परिस्थिती यामध्ये मोठी तफावत असल्याने संबंधित यंत्रणेकडून भ्रामक माहिती देण्यात आली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शाळेच्या वेळेत वाहतूक बंद असल्याचा दावा करण्यात आला असताना आजची घटना त्या दाव्याला छेद देणारी ठरत आहे.
या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन शाळेच्या वेळेत बॉक्साईट वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश कठोरपणे अंमलात आणावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच चौकशीदरम्यान चुकीची माहिती देणाऱ्या संबंधितांवर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी जोर धरत आहे.
मांदिवली येथील या प्रकारामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आता संबंधित विभाग कोणती कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











