देवरूख पोलिसांची ‘सुपरफास्ट’ कारवाई! रिक्षाचालकाच्या मृत्यूस कारणीभूत असलेला फरार चालक आंबा घाटात गजाआड

देवरूख (प्रतिनिधी)

रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील देवळे फाट्यावर उभ्या रिक्षाला धडक देऊन चालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या फरार वाहनचालकाला देवरूख व साखरपा पोलीसांनी अवघ्या दोन तासांत पकडत कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे. पोलीसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे कौतुक होत आहे.

देवळे फाट्यावर प्रवाशांची वाट पाहत उभे असलेल्या चाफवली येथील रिक्षाचालक विजय पांडुरंग कांबळे (वय- ६२) यांच्या रिक्षाला मागून भरधाव वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षा सुमारे दहा फूट दूर फेकली गेली आणि विजय कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला होता. अपघाताची माहिती मिळताच देवरूख आणि साखरपा पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली.

व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित स्काँर्पिओ वाहन (MH 09 GA 6886) ओळखण्यात आले. त्यानंतर पोलीसांनी शोधमोहीम राबवत आंबा घाट परिसरात अवघ्या काही तासांत चालकाला ताब्यात घेतले. ही कारवाई देवरूखचे पोलीस निरीक्षक उदय झावरे, साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, सहायक पोलीस फौजदार शांताराम पंदेरे, हे. काँ. गणेश सुतार, चालक श्री. कांबळे, पो. हे. काँ. सचिन कामेरकर, पो. हे. काँ. सचिन पवार यांनी केली. याकामी पोलीस मित्र सुभाष सुर्वे यांनी मदत केली. दरम्यान, वेगवान आणि समन्वयपूर्ण कारवाईमुळे स्थानिक नागरिकांकडून देवरूख व साखरपा पोलीसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.