राजापूर (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राजापूर पोलीस ठाण्याच्या वतीने शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी या महिलांचा सन्मान केला.
याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल हर्षदा करगुटकर यांसह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पोलीस प्रशासनाच्या वतीने कथ्थक विशारद सौ. भारती उत्तम प्रभुदेसाई, कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट तज्ञ सुगंधा अशोक पुजारी, राज्यस्तरीय कॅरम स्पर्धा विजेती कु. निधी मनोज सप्रे तसेच पुष्परचनाकार सौ. तन्वी प्रदीप कोळेकर यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजनासाठी माजी नगरसेविका, समाजसेविका व विद्यार्थिप्रिय माजी शिक्षिका प्रतिभा मराठे यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या गुणग्राहक वृत्तीमुळे सन्मानित महिलांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा व ऊर्जा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
यावेळी पोलीस निरीक्षक अमित यादव, पोलीस उपनिरीक्षक उबाळे व हेड कॉन्स्टेबल हर्षदा करगुटकर यांनी मार्गदर्शन करताना पोलीस हे जनतेचे मित्र आहेत. विशेषतः महिला व मुलींनी अन्याय सहन न करता तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी. पोलीस प्रशासन त्यांच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर आहे अशी ग्वाही दिली.













