रत्नागिरी जिल्हा बँकेचे भागभांडवल १७५ कोटी करणार

संचालकांच्या जागाही २१ वरून २५ होणार; वार्षिक सर्वसाधारण सभेतील निर्णय

रत्‍नागिरी : प्रतिनिधी
रत्‍नागिरी जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेची विशेष सर्वसाधारण सभा पोटनियमांच्‍या दुरुस्‍तीसाठी पार पडली. यात बँकेचे भागभांडवल 75 कोटीवरुन 125 कोटी करण्‍यावर संमती देण्‍यात आली. त्‍याचप्रमाणे बँकेच्‍या संचालक मंडळावर असणार्‍या 21 संचालकांच्‍या जागांमध्‍ये वाढ करताना भविष्‍यात 25 जागा करण्‍यावरही सर्व सभासदांनी संमती दिली असून याबाबत प्रस्‍ताव सहकार खात्‍याकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे.

जिल्‍हा बँकेचे अध्‍यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली विशेष साधारण सभा मराठा मंडळाच्‍या सभागृहात आयोजित करण्‍यात आली होती. 11 वा. या सभेला सुरुवात झाली. सभेच्‍या पटलावर ठेवलेले विषय अवघ्‍या पंधरा मिनिटात सभासदांनी मंजूर केले.

शासनाच्‍या सहकार खात्‍याच्‍या नवीन धोरणानुसार बँकेच्‍या पोटनियमांमध्‍ये दुरुस्‍त्‍या सुचवण्‍यात आलेल्‍या आहेत. यानुसार भागभांडवल 75 कोटीवरुन 125 कोटी करण्‍याचा निर्णयावर शिक्‍कामोर्तब करण्‍यात आले. याला सभासदांनी मंजुरी दिली.

यातील दुसरा महत्‍वाचा बदल म्‍हणजे भविष्‍यात होणार्‍या बँकेच्‍या निवडणुकांमध्‍ये संचालकांच्‍या मतदारसंघात वाढ करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला. सद्यस्‍थितीत 21 संचालक असून ही संख्‍या आता 25 करण्‍याबाबत पोटनियमात दुरुस्‍ती करण्‍यात आली. काही मतदार संघ दोन करण्‍याचा निर्णय घैण्‍यात आला आहे. यात सध्‍या कृषि पणन, शेतील माल प्रक्रिया संस्‍था व व्‍यक्‍ती असा जिल्‍हा करिता एक मतदार संघ होता. तो आता कृषि पणन, शेतील माल प्रक्रिया संस्‍था असा एक आणि सर्वसाधारण व व्‍यक्‍ती असा दुसरा मतदार संघ जिल्‍ह्यासाठी केला जाणार आहे.

गृहनिर्माण, गृहतारण सहकारी संस्‍था व पगारदार नोकरांच्‍या संस्‍था असा जिल्‍ह्यासाठी एक मतदार संघ होता. यात बदल करुन गृहनिर्माण व गृहतारण सहकारी संस्‍थांसाठी एक आणि पगारदार नोकरांच्‍या संस्‍थांसाठी एक असे संपूर्ण जिल्‍ह्यासाठ दोन मतदार संघ वेगळे केले जाणार आहेत.
मजूर संस्‍था, स्‍वयंरोजगार, बेरोजगार व हमाल कामगार सहकारी संस्‍था असा जिल्‍ह्यासाठी एक मतदार संघ होता. त्‍यात बदल करुन मंजूर संस्‍थांसाठी एक आणि स्‍वयंरोजगार, बेरोजगार व हमाल कामगार संस्‍थांसाठी एक असे जिल्‍ह्याकरीता मतदार संघाची मागणी केली जात आहे.

औद्योगिक वाहतूक व्‍यवसाय, देखरेख उत्‍पादक सहकारी संस्‍था व मच्‍छीमार सहकारी संस्‍था व अन्‍य सहकारी संस्‍था यांचा जिल्‍ह्यासाठी एक मतदार संघ होता. यात बदल करुन औद्योगिक वाहतूक व्‍यवसाय, देखरेक उत्‍पादक सहकारी संस्‍थांसाठी एक आणि मच्‍छीमार सहकारी संस्‍था व अन्‍य सहकारी संस्‍थांसाठी एक संपूर्ण जिल्‍ह्यासाठी एक मतदार संघ असणार आहे. या पोटनियमांच्‍या दुरुस्‍तीलाही सभासदांनी संमंती दिली.

संचालक मंडळाच्‍या निवडणुकीसाठी ज्‍या संस्‍थेतून उमेदवार प्रतिनिधीत्‍व करीत असेल त्‍या संस्‍थेचे बँकेकडे एक लाखाचे भागभांडवल आवश्‍यक आहे. त्‍याचप्रमाणे संस्‍थेचा बँकेशी तीन वर्ष सलग कर्जव्‍यवहार असणे आवश्‍यक आहे. सर्वसाधारण संघातून निवडणूक लढवणार्‍या उमेदवाराचे बँकेत एक लाखाच्‍या ठेवी असणे आवश्‍यक आहेत. त्‍याचप्रमाणे निवडणुकीला उभे राहणार्‍या उमेदवारांनी किमान तीन दिवसांचे सहकार प्रशिक्षण मान्‍यता प्राप्‍त संस्‍थेकडून घेतलेले आवश्‍यक ठरणार आहे.

सोने-चांदी दागिण्‍यांवर यापूर्वी बँकेत 10 लाखापर्यंत कर्ज दिले जात होते. ती मर्यादा 20 लाखापर्यंत वाढवण्‍याबाबतही संमंती देण्‍यात आली. याबाबत बँकेच्‍या सध्‍याच्‍या पोटनियमात दुरुस्‍ती करण्‍याबाबतचा प्रस्‍ताव सहकार खात्‍याकडे मंजुरीसाठी पाठवण्‍यात येणार असल्‍याचे बँकेचे अध्‍यक्ष डॉ. चोरगे यांनी सांगितले. यावेळी सर्व संचालक मंडळ व सभासद मोठ्या संख्‍येने उपस्‍थित होते.