रत्नागिरी जिल्हा कृषी सल्ला: ७ व ८ मे रोजी पावसाची शक्यता; आंबा, काजू आणि मूग उत्पादकांना खबरदारीचा इशारा

रत्नागिरी:
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि भारत मौसम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी हवामानावर आधारित नवीन कृषी सल्ला जाहीर करण्यात आला आहे. आगामी दिवसांत उष्णतेत वाढ होण्यासोबतच काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान अंदाज आणि इशाराप्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईच्या अंदाजानुसार, रत्नागिरी जिल्ह्यात ७ आणि ८ मे रोजी तुरळक ठिकाणी दुपारी किंवा संध्याकाळी हलका पाऊस किंवा गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. ६ मे पासून कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होऊन ते ३३ ते ३६ अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकते. या काळात हवामान उष्ण व दमट राहण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे तयार झालेला हापूस आंबा आणि काजू बियांची काढणी तातडीने करून त्या सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आंब्यावरील फळमाशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बागेत प्रति एकर २ ‘रक्षक सापळे’ लावावेत. फळांमधील साक्याचे प्रमाण कमी करण्यासाठी काढणी सकाळी १० वाजेपूर्वी किंवा संध्याकाळी ४ नंतर ‘नूतन’ झेल्याच्या साह्याने करावी.

खरीप भात लागवडीसाठी जमिनीची नांगरट करून जमीन उन्हात तापू द्यावी. यामुळे किडी आणि तणांचे नियंत्रण होण्यास मदत होईल. विद्यापीठाने रत्नागिरी-१, २४, ७, ८ आणि कर्जतच्या विविध जातींची शिफारस केली असून बियाण्यांची आगाऊ नोंदणी करण्याचे सुचवले आहे.

मुगाच्या शेंगा पक्व झाल्या असल्यास त्यांची तोडणी सकाळी करावी. पावसापासून संरक्षणासाठी काढलेला माल झाकून ठेवावा. हळदीची लागवड एप्रिलअखेर ते मे महिन्यात करणे फायदेशीर असून सरी वरंबा पद्धतीने लागवड करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

वाढत्या उष्णतेपासून जनावरांचा बचाव करण्यासाठी त्यांना दिवसा स्वच्छ आणि थंड पाणी उपलब्ध करून द्यावे. उष्माघाताचा ताण कमी करण्यासाठी पाण्यात १% गूळ आणि ०.५% मीठ मिसळून द्यावे. दुपारच्या तीव्र उन्हात जनावरांना चरण्यास बाहेर सोडू नये आणि गोठ्यात शक्य असल्यास फॉगरचा वापर करावा. कुक्कुटपालनामध्ये पक्षांना पुरेसे पाणी द्यावे आणि खाद्य सकाळी लवकर किंवा संध्याकाळी द्यावे.

माती परीक्षणशेतकऱ्यांनी जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी दर ३ ते ४ वर्षांनी माती परीक्षण करणे आवश्यक आहे. भात आणि नागली पिकासाठी २० ते २५ सेंमी, तर आंबा व काजू पिकासाठी ६० सेंमी खोलीवरील मातीचा नमुना घ्यावा. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी जवळच्या कृषी विद्यापीठ केंद्र किंवा कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञ समितीने केले आहे.