रस्त्यावर मासेविक्री करणाऱ्या महिलेचा रूद्रावतार

नगर परिषद प्रशासनातर्फे पो. स्थानकात गुन्हा दाखल

राजापूरः प्रतिनिधी शहरात येऊन रस्त्यावर मासेविक्री करीत असताना त्याला प्रतिबंध करणाऱ्या न.प.च्या कर्मचाऱ्यांना अरेरावी करीत शिवीगाळ केल्याप्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजापूर शहरात होणाऱ्या सार्वजनिक ठिकाणच्या रस्त्यावरील मासे विक्रीचा प्रश्न गेले अनेक महिने गाजत आहे. न.प.प्रशासन त्याविरोधात कारवाईची प्रक्रिया देखील राबवत आहे. मात्र काही महिला विनंती आणी त्यानंतरच्या कारवाईला देखील जुमानत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.६ मे २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता शिवाजी पथ ते बाजारपेठ परिसरात नगर परिषदेचे स्वच्छता मुकादम राजन रामचंद्र जाधव आणि स्वच्छता निरीक्षक अमित पोवार हे सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर मासेविक्री करणाऱ्या महिलांवर कारवाईसाठी गेले होते. त्यावेळी कातळी सागवे येथील अनिसा रशीद फणसोपकर या बाजारपेठेत मासे विक्रीसाठी बसल्या होत्या. त्यांना मच्छीमार्केटमध्ये जाऊन विक्री करण्याची सूचना दिली असता त्यांनी जाण्यास नकार देत तेथेच विक्री सुरू केली. दरम्यान नगर परिषद कर्मचाऱ्यांनी मासळीची टोपली जप्त करून कार्यालयात नेत असताना आरोपी महिलेने त्यांच्या मागे धावत जाऊन शिवीगाळ केली. पुढे नगर परिषद कार्यालयात येऊन तिने फिर्यादी जाधव यांच्या हातातील टोपली खेचून घेतली व सरकारी कामात अडथळा निर्माण केला अशी फिर्याद दाखल आहे.

याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२१, ३५२, महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम १९६५ चे कलम २६७, २६९ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११० अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे मासेविक्री करू नये तसेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा पोलिसांनी दिला आहे.