बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात एका विवाहित महिलेला तिच्या पतीने जिवंत पेटवल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पत्नीने साडीऐवजी गाऊन परिधान केल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला होता. हा वाद इतका टोकाला गेला की पतीने पत्नीवर रॉकेल टाकून तिला पेटवून दिल्याचा आरोप आहे. गंभीर भाजलेल्या महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.
साडीऐवजी गाऊन घातल्याने पेटला वाद
बेळगाव : संसारात पती-पत्नीमध्ये छोटे-मोठे वाद होत असतात. मात्र काहीवेळा हे वाद भीषण वळण घेतात. अशीच एक धक्कादायक घटना खानापूर तालुक्यातील हत्तरवाड गावात उघडकीस आली आहे. पत्नीने साडीऐवजी गाऊन परिधान केला, या कारणावरून संतापलेल्या पतीने तिच्यावर अमानुष अत्याचार करत तिला जिवंत पेटवल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णाजी पाटील असे आरोपी पतीचे नाव असून मंजुळा पाटील असे जखमी महिलेचे नाव आहे. दोघांमध्ये मागील काही दिवसांपासून वारंवार कौटुंबिक वाद होत होते. आरोपी कृष्णाजी हा पत्नीचा मानसिक आणि शारीरिक छळ करत असल्याची माहितीही समोर आली आहे.
शेजाऱ्यांनी वाचवले महिलेचे प्राण
काही दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास मंजुळाने घरात गाऊन घातला होता. याच कारणावरून कृष्णाजीने तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. वाद वाढत गेल्यानंतर आरोपीने संतापाच्या भरात पत्नीवर ज्वलनशील पदार्थ टाकून तिला पेटवून दिल्याचा आरोप आहे. आग लागल्यानंतर मंजुळा गंभीररीत्या भाजली असून तिच्या आरडाओरडीनंतर शेजाऱ्यांनी तातडीने धाव घेतली.
स्थानिक नागरिकांनी आग विझवून मंजुळाला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर सध्या उपचार सुरू असून ती गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी कृष्णाजी पाटील याला ताब्यात घेतले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास प्रहार डिजिटलच्या माहितीनुसार सुरू आहे.










