लांजा महाविद्यालयात बारावी उत्तीर्ण (कला वाणिज्य विज्ञान) विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

लांजा (प्रतिनिधी) :शैक्षणिक दृष्टीने परिपूर्ण असलेल्या लांजा येथील न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी बारावी उत्तीर्ण (कला- वाणिज्य विज्ञान) विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
लांजा महाविद्यालय हे नॅक ए मानांकन आणि मुंबई विद्यापीठाचा ग्रामीण भागातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्राप्त असलेले महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मापक शुल्कामध्ये गुणवत्ता पूर्ण शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. लांजा महाविद्यालयात कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांमध्ये विविध पदवी अभ्यासक्रम उपलब्ध असून कला शाखेत मराठी इंग्रजी व हिंदी अर्थशास्त्र, वाणिज्य शाखेत बी कॉम ,बी कॉम (अकाउंटंट अँड फायनान्स) आणि विज्ञान शाखेत रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणिशास्त्र ,गणित या विषयांची सोय उपलब्ध आहे. याशिवाय शास्त्र शाखेमध्ये बीएससी कॉम्प्युटर सायन्स हा व्यावसायिक कोर्सही सुरू केलेला आहे. पदवीधर स्तरावर एम.ए ,एम कॉम व एम एस सी हे अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत.
या महाविद्यालयामध्ये अनुभवी प्राध्यापक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा, आधुनिक संगणक कक्ष, समृद्ध ग्रंथालय ,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम तसेच करियर मार्गदर्शनाच्या सुविधा त्यासोबतच शिकत असताना विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्यासाठी प्लेसमेंट आणि कौन्सलिंग
कक्षा मार्फत विविध कंपन्यांचे प्लेसमेंट आयोजित केले जातात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्यामध्ये रोजगार भिमुखता निर्माण करण्यासाठी विविध कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधी मधून अल्पकालीन अभ्यासक्रमांचे आयोजन केले जाते.
महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. ऑनलाइन प्रक्रिया महाविद्यालयामध्ये मोफत पूर्ण करू दिली जाईल. त्यानंतर महाविद्यालयाच्या प्रवेश अर्जासोबत ऑनलाईन भरलेला फॉर्म महाविद्यालयीन कार्यालयात सादर करणे बंधनकारक आहे. ही प्रक्रिया ,६ मे पासून सुरू झालेली असून पहिली गुणवत्ता यादी २६ मे रोजी जाहीर होणार आहे. त्यानंतर कागदपत्र पडताळणी व फी भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. नवीन अभ्यास शैक्षणिक वर्षाचे अध्यापन १३ जून २०२६ पासून सुरू होणार आहे.
महाविद्यालयीन प्रवेशासाठी दहावी आणि बारावीचे गुणपत्रक ,आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला व पासपोर्ट आकाराचे फोटो आवश्यक आहेत. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी वेळेत नोंदणी करून आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन महाविद्यालय प्रशासनाकडून करण्यात आले आहे.