जळगाव बसस्थानकात वृद्धाची फसवणूक; ‘शनीची महादशा’ सांगत सोन्याची अंगठी आणि रोकड लंपास

भोंदूबाबांनी हातचलाखीने वृद्धाचा विश्वास जिंकला
बंद पोलिस चौकीजवळ नेऊन केली लूट

जळगाव येथील नवीन बसस्थानकात दोन भामट्यांनी एका वृद्धाची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘तुमच्यावर शनीची महादशा आहे’ असे सांगत त्यांनी वृद्धाचा विश्वास संपादन केला. हातचलाखी दाखवत धार्मिक आणि अंधश्रद्धेचा आधार घेत वृद्धाकडील सोन्याची अंगठी आणि रोकड लंपास करण्यात आली. ही घटना २० एप्रिल रोजी घडली असून याप्रकरणी पेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींचा शोध सुरू केला असून या प्रकारामुळे बसस्थानक परिसरात खळबळ उडाली आहे.


जळगाव : शहरातील नवीन बसस्थानक परिसरात दोन भोंदूबाबांनी एका वृद्धाला गंडा घालत त्यांच्याकडील सोन्याची अंगठी आणि ९०० रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. गजानन विठोबा सर्जेराव (वय ६७) हे कामानिमित्त बसस्थानकात आले असताना दोन भामटे त्यांच्या संपर्कात आले. त्यांनी “तुमच्यावर शनीची महादशा सुरू आहे” असे सांगून भीती निर्माण केली आणि त्यातून मार्ग काढून देण्याचे आमिष दाखवले.

यावेळी आरोपींनी विविध धार्मिक गोष्टी सांगत तसेच हातचलाखीचे प्रयोग करून सर्जेराव यांचा विश्वास संपादन केला. एका भामट्याने त्यांच्या समोर खडा ठेवून काही मंत्रोच्चार केले. त्यानंतर “राम म्हणा आणि मूठ उघडा” असे सांगितल्यावर हातात रुद्राक्ष दिसल्याने वृद्ध अधिकच त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू लागले. या प्रकारामुळे आरोपींनी सर्जेराव यांना पूर्णपणे आपल्या जाळ्यात ओढले.

यानंतर दोन्ही भामटे सर्जेराव यांना बसस्थानकातील बंद पोलिस चौकीजवळ घेऊन गेले. त्यांनी “शनीचा प्रभाव दूर करण्यासाठी” अंगातील वस्तू बाहेर काढण्यास सांगितले. आरोपींच्या सांगण्यावरून सर्जेराव यांनी हातातील सोन्याची अंगठी आणि खिशातील पैसे बाहेर काढले. त्यानंतर आरोपींनी त्या वस्तू एका कागदात ठेवण्यास सांगितले आणि सर्जेराव यांना मागे वळून न पाहण्यास बजावले.

काही वेळाने सर्जेराव यांनी मागे वळून पाहिले असता दोन्ही भामटे तेथून पसार झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी तत्काळ पेठ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.