“सिंधुदुर्ग म्हणजे गावागावात नाटक, घराघरात नट आणि लोककलेचे भांडार” : विजय गोखले

महाराष्ट्र शासन रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ, मुंबईची सर्वसाधारण सभा श्री देव कुणकेश्वर भक्त निवास येथे मंडळाचे अध्यक्ष विजय गोखले, सचिव दिलीप वाघमारे, सिंधुदुर्गचे सदस्य विजय मुकुंद चव्हाण, रत्नागिरीचे सदस्य राजेश गोसावी तसेच पद्मश्री पुरस्कार विजेते परशुराम खुणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

 

सायंकाळी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना ज्येष्ठ अभिनेते व मंडळाचे अध्यक्ष विजय गोखले बोलत होते. ते म्हणाले की, “रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाच्या इतिहासात आणि विजय चव्हाण यांच्या कार्यकाळात दुसऱ्यांदा सिंधुदुर्गमध्ये मंडळाची सभा होत आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात आतापर्यंत दोन वेळा सभा झालेली नाही. विजय चव्हाण यांच्या आग्रहामुळे आणि आपुलकीच्या निमंत्रणामुळे सिंधुदुर्ग जवळून अनुभवता आला.”

 

ते पुढे म्हणाले, “सिंधुदुर्गातील लोककला, नाट्यसंस्कृती, कलाकार, येथील निसर्ग, निळेशार समुद्रकिनारे आणि जागृत देवस्थानांचा अनुभव अविस्मरणीय आहे. यापूर्वी फक्त ऐकून होतो, पण प्रत्यक्ष पाहिल्यानंतर खात्री पटली की सिंधुदुर्ग म्हणजे प्रत्येक गावात नाटक आणि प्रत्येक घरात नट असलेला जिल्हा आहे.”

 

प्रभू परशुरामाच्या या पावन भूमीत देवदेवतांनी आणि निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केली असून, कोकणाने आपले नैसर्गिक वैभव जपले पाहिजे. चित्रपट आणि मालिकांसाठी लोकेशन देताना त्याचे महत्त्व जपले गेले पाहिजे, असेही विजय गोखले यांनी नमूद केले.

 

महाराष्ट्रभर मराठीसह विविध भाषांमध्ये सादर होणाऱ्या सर्व प्रकारच्या रंगमंचीय आविष्कारांचे प्रयोगपूर्व परिनिरीक्षण करण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी या मंडळावर आहे. धार्मिक तेढ निर्माण करणारे, राष्ट्रीय भावना दुखावणारे, जातीय किंवा धर्मविरोधी भावना वाढविणारे, हिंसाचार किंवा गुन्हेगारीला प्रोत्साहन देणारे तसेच महिला, मागासवर्गीय आणि सामाजिक घटकांचे अवमूल्यन करणारे आशय रंगमंचावर येऊ नयेत, यासाठी संहितेचे काटेकोर परीक्षण केले जाते. आक्षेपार्ह संहितांवर सखोल चर्चा करून आवश्यक निर्णय घेणे किंवा परवानगी नाकारणे ही जबाबदारी मंडळ पार पाडते.

 

या मंडळावर सिंधुदुर्गचे ज्येष्ठ रंगकर्मी, नाट्यलेखक आणि सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुकुंद चव्हाण सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या तसेच रत्नागिरीचे सदस्य राजेश गोसावी यांच्या पुढाकाराने या सभेचे आयोजन करण्यात आले होते.

 

सभेनंतर मंडळाच्या सदस्यांनी सिंधुदुर्ग किल्ला, विजयदुर्ग किल्ला, देवगड किल्ला, विमलेश्वर मंदिर, देवगड बंदर, राजकोट, श्री देव कुणकेश्वर, देवबाग, तारकर्ली, तांबळडेग आदी पर्यटनस्थळांना भेट देत कोकणाच्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेतला.

 

रात्री आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विविध लोककला आणि रंगमंचीय आविष्कार सादर करण्यात आले. अध्यक्ष विजय गोखले यांची हास्य मैफल, सदस्य राहुल वैद्य यांचा “शिवराज्याभिषेक” आविष्कार, राजेश गोसावी यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीतील लांजा-कुरणे नवलादेवी नमन मंडळाच्या ४० कलाकारांनी सादर केलेले नमन, सावंतवाडीचे वैभव पारकर व रामदास पारकर यांचे जादूचे प्रयोग, अक्षरसिंधु कणकवलीचे प्रमोद तांबे यांनी सादर केलेला विजय चव्हाण लिखित “झम्पय” नाटकातील नाट्यप्रवेश, देवगडचे प्रमोद जोशी यांच्या कविता, कल्पना बांदेकर आणि सदस्य मकरंद पाध्ये यांनी सादर केलेल्या मालवणी कविता व एकपात्री प्रयोग, विजय चव्हाण यांची खुमासदार मालवणी शैली, राजेश गोसावी यांचे संगमेश्वरी गाऱ्हाणे तसेच मयूर चव्हाण यांनी सादर केलेली विजय चव्हाण लिखित “भरकाट” मधील नाट्यछटा यांना उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

 

या निमित्ताने विजय मुकुंद चव्हाण यांच्या कार्याचे सर्व मान्यवरांनी मुक्तकंठाने कौतुक केले. “मागील तीन वर्षांत विजय चव्हाण यांच्या माध्यमातून सिंधुदुर्गची कला, संस्कृती आणि लोकपरंपरा जवळून अनुभवता आली. सिंधुदुर्गच्या कलावंतांना चित्रपट, मालिका आणि नाटकांत निश्चित संधी मिळेल,” असे गौरवोद्गार मान्यवरांनी काढले.

 

यावेळी उपस्थितांनी पारंपरिक मालवणी खाद्यसंस्कृतीचाही मनमुराद आनंद घेतला. चुलीवरील घरगुती जेवण, आंबे, फणस, जांभूळ, करवंद, ओले काजूगर, मासे, आमरस, कोकम सरबत आणि कैरीचे पन्हे यांसारख्या खास कोकणी पदार्थांची मेजवानी अनुभवता आली.

 

या सभेला अध्यक्ष विजय गोखले, सचिव दिलीप वाघमारे, पद्मश्री परशुराम खुणे, पी. डी. कुलकर्णी, संजय भाकरे, अशोक हंडोरे, संजय शेवतेकर, संजय देवालाणकर पाटील, सदानंद बोरकर, मुकुंद पटवर्धन, जुगलकिशोर ओझा, विश्वनाथ निळे, गुरुनाथ वठारे, दिलीप अलोणे, रवींद्र नंदाने, शिवानी जोशी, सुजाता मराठे, मोनिका ठक्कर, मकरंद पाध्ये, राहुल वैद्य, राजेश गोसावी, विजय मुकुंद चव्हाण तसेच मंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.