नाशिक पोलिसांची मोठी कारवाई; मतीन पटेलविरोधात गुन्हा दाखल
25 मार्चपासून फरार असलेल्या निदा खानला सापळा रचून अटक
महिलांचे लैंगिक शोषण, धर्मांतराचा प्रयत्न आणि इतर गंभीर आरोपांमुळे चर्चेत आलेल्या निदा खान प्रकरणात आता नवे धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणात एमआयएमचा कार्यकर्ता मतीन पटेल याला सहआरोपी करण्यात आले आहे. पोलिसांच्या तपासात मतीन पटेलने निदा खानला आश्रय दिल्याची माहिती समोर आली आहे. 25 मार्चपासून फरार असलेल्या निदा खानला अखेर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. या प्रकरणामुळे संभाजीनगर आणि नाशिक परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
नाशिक : महिलांचे लैंगिक शोषण, धर्मांतराचा प्रयत्न आणि इतर गंभीर आरोपांमुळे चर्चेत आलेल्या निदा खान प्रकरणात आता नवीन माहिती समोर आली आहे. या प्रकरणात एमआयएमचा कार्यकर्ता मतीन पटेल याला सहआरोपी करण्यात आले असून पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मतीन पटेलने निदा खानला आश्रय दिला होता. त्यामुळे त्याच्याविरोधात बीएनएस कलम 249 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास यंत्रणांकडून त्याला समोरासमोर बसवून चौकशी करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मतीन पटेल हा एमआयएम पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता असून संभाजीनगर परिसरात त्याची ओळख आहे. तो यापूर्वीही विविध वादांमुळे चर्चेत आला होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका वादग्रस्त व्हिडिओमुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. तसेच तो एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्या निकटवर्तीयांपैकी एक असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, निदा खान ही गेल्या 25 मार्चपासून फरार होती. पोलिसांना अनेक दिवस ती गुंगारा देत होती. तपासादरम्यान ती नारेगावातील कैसर कॉलनीतील फ्लॅटमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या ठिकाणी सापळा रचून अखेर पोलिसांनी तिला अटक केली.
माहितीनुसार, निदा खान तिची आई, भाऊ आणि काकीसोबत राहत होती. ती काही दिवसांपूर्वीच त्या फ्लॅटमध्ये राहण्यासाठी आली होती. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे या परिसराची रेकी केली आणि त्यानंतर कारवाई करत तिला ताब्यात घेतले.
या प्रकरणात आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता असून पोलिसांकडून तपास वेगाने सुरू आहे. या कारवाईनंतर संभाजीनगर परिसरात मोठी चर्चा रंगली आहे.











