१७ भारतीय क्रू सदस्यांची सुटका; चार जण भाजल्याने उपचार सुरू
इराण-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर समुद्री मार्गात वाढली चिंता
होर्मुझ सामुद्रधुनीजवळ भारतीय क्रू सदस्यांना घेऊन जाणाऱ्या एका लाकडी ढोला आग लागल्याची गंभीर घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. उर्वरित १७ भारतीय क्रू सदस्यांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. जखमींवर दुबईमध्ये उपचार सुरू असून भारतीय वाणिज्य दूतावास परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. दरम्यान, इराण आणि अमेरिकेमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या सामुद्रधुनीतील सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
दुबई : होर्मुझ सामुद्रधुनीजवळ भारतीय क्रू सदस्यांना घेऊन जाणाऱ्या एका लाकडी ढोला आग लागल्याने मोठी दुर्घटना घडली. या घटनेत एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला असून चार जण गंभीररीत्या भाजले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या लाकडी ढोमध्ये एकूण १८ भारतीय क्रू सदस्य होते. शुक्रवारी ही घटना घडल्यानंतर परिसरात कार्यरत असलेल्या एका जहाजाने बचावकार्य करत उर्वरित १७ जणांची सुटका केली.
सूत्रांच्या माहितीनुसार, जखमींवर सध्या दुबईमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे.
दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्री बचावलेल्या भारतीय नागरिकांची भेट घेतली. तसेच बाधित क्रू सदस्यांना आवश्यक ती मदत पुरवली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, ही घटना इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर घडली आहे. होर्मुझ सामुद्रधुनी हा पर्शियन गल्फ आणि ओमानच्या आखाताला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग मानला जातो. जगातील मोठ्या प्रमाणातील तेल आणि नैसर्गिक वायू वाहतूक या मार्गातून केली जाते.
दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी जाहीर झाल्यानंतरही या भागात तणाव कायम असल्याचे दिसून येत आहे. अमेरिकन नौदलाच्या जहाजांवर इराणकडून क्षेपणास्त्र, ड्रोन आणि लहान बोटींमार्फत हल्ले झाल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. त्यानंतर अमेरिकेकडून प्रत्युत्तरात्मक कारवाई करण्यात आल्याचेही सांगितले जात आहे.
त्याचवेळी इराणने अमेरिकेवर युद्धबंदीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. इराणी लष्कराच्या मते, अमेरिकेने तेल टँकर आणि काही नागरी भागांनाही लक्ष्य केले. या वाढत्या संघर्षामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतील शिपिंग वाहतुकीवर मोठा परिणाम होत असल्याची माहिती समोर आली आहे.











