चिपळूण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नुकताच जाहीर झालेल्या माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) मार्च २०२६ च्या निकालात सह्याद्रि शिक्षण संस्था, सावर्डे संचलित मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी उल्लेखनीय यश संपादन करत पुन्हा एकदा गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.
संस्थेच्या मराठी माध्यमाच्या ३३ व इंग्रजी माध्यमाच्या ३ अशा एकूण ३६ शाळांमधून १४७० विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १४२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून संस्थेचा एकूण निकाल तब्बल ९७ टक्के लागला आहे. या यशामध्ये गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनी कु. स्वरा महेश खातू हिने ९८.२० टक्के गुण मिळवून संपूर्ण संस्थेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या उज्ज्वल यशामुळे विद्यालयासह परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. याच विद्यालयाचा विद्यार्थी कु. शौर्य सुनील टाकसाळे याने ९७ टक्के गुण मिळवून संस्थेत द्वितीय क्रमांक मिळविला आहे. तसेच गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथील कु. तेजस अमित राऊत आणि धोंडीराम शेठ दाभोळकर इंग्लिश मीडियम स्कूल, खेर्डी-चिंचघरी (सती) येथील कु. हर्षवर्धन सोमनाथ भिंगे या दोन्ही विद्यार्थ्यांनी ९६ टक्के गुण मिळवत संस्थेत संयुक्त तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये २९८ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य श्रेणी मिळविली असून ५५० विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ४४८ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर १३१ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. अवघे ४३ विद्यार्थी अनुत्तीर्ण राहिले आहेत. संस्थेच्या विविध शाळांनी ग्रामीण भागात कार्यरत राहूनही सातत्याने दर्जेदार शिक्षण देत उत्कृष्ट निकालाची परंपरा जपली असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे. संस्थेच्या यशाबाबत बोलताना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमांसोबत विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचे सहकार्य आणि संस्थेचे दूरदृष्टीचे नियोजन यामुळे हे यश शक्य झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने संस्था सातत्याने विविध उपक्रम राबवत असून त्याचा सकारात्मक परिणाम निकालात दिसून येत आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. शेखरजी निकम यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष प्रशांत निकम, सौ. युगंधरा प्रकाश राजेशिर्के, डॉ. इसाक खतीब, कार्याध्यक्ष अनिरुद्ध शेखर निकम, संस्थेचे सेक्रेटरी महेश मनोहर महाडिक, सर्व विश्वस्त, पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केले आहे.













