SA20 लीगसाठी ऑस्ट्रेलियन खेळाडू घरच्या मालिकांना मुकणार? पॅट कमिन्सने फेटाळले दावे

फ्रँचायझी क्रिकेटच्या वाढत्या पैशांवरून चर्चांना उधाण
‘माझ्याबद्दल लिहिलेली माहिती पूर्णपणे चुकीची’ – पॅट कमिन्स

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने वरिष्ठ खेळाडू घरच्या क्रिकेटला प्राधान्य न देता परदेशी फ्रँचायझी लीगमध्ये खेळण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या फेटाळून लावल्या आहेत. काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, ऑस्ट्रेलियन खेळाडू SA20 आणि द हंड्रेडसारख्या स्पर्धांसाठी ना-हरकत प्रमाणपत्र मागू शकतात, असा दावा करण्यात आला होता. मात्र कमिन्सने सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत हे सर्व दावे बनावट असल्याचे स्पष्ट केले. फ्रँचायझी क्रिकेटमधील वाढत्या आर्थिक संधींमुळे क्रिकेट विश्वात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाही बिग बॅश लीगच्या रचनेत बदल करण्याच्या विचारात असल्याचे समोर आले आहे.


नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने वरिष्ठ ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू घरच्या क्रिकेट हंगामाला दुय्यम महत्त्व देत परदेशी फ्रँचायझी लीगमध्ये खेळण्यास प्राधान्य देतील, या दाव्यांचे जोरदार खंडन केले आहे.

एका वृत्तानुसार, कमिन्ससह ऑस्ट्रेलियातील काही प्रमुख खेळाडू २०२८ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील SA20 लीगमध्ये सहभागी होण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) मागू शकतात. कारण बिग बॅश लीग (BBL)मध्ये त्यांना त्यांच्या बाजारमूल्यानुसार मानधन मिळत नसल्याचा दावा करण्यात आला होता.

अहवालात असेही नमूद करण्यात आले होते की, पॅट कमिन्स, जोश हेझलवुड आणि मिचेल स्टार्क यांना यंदाच्या द हंड्रेड स्पर्धेसाठी सुमारे ८ लाख डॉलर्स किमतीच्या ऑफर मिळाल्या होत्या. जगभरात वाढणाऱ्या फ्रँचायझी क्रिकेटमुळे निर्माण होणाऱ्या आर्थिक दबावावरही या वृत्तात प्रकाश टाकण्यात आला होता.

तसेच, SA20 आणि द हंड्रेडसारख्या स्पर्धांमध्ये सध्या BBLपेक्षा अधिक मोठे करार मिळत असल्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया बिग बॅश लीगच्या रचनेत बदल करण्याचा विचार करत असल्याचेही सांगण्यात आले. यामध्ये परदेशी खेळाडूंसाठी असलेली ड्राफ्ट प्रणाली रद्द करण्याचाही विचार सुरू असल्याचे वृत्तात म्हटले होते.

मात्र, या बातम्यांनी सोशल मीडियावर वेग घेतल्यानंतर पॅट कमिन्सने स्वतः पुढे येत हे सर्व दावे चुकीचे असल्याचे स्पष्ट केले. त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “SA20 NOC आणि द हंड्रेड ऑफरबाबत माझ्याविषयी जे काही लिहिले गेले आहे ते पूर्णपणे बनावट आहे.”

यापूर्वी बिझनेस ऑफ स्पोर्ट पॉडकास्टमध्ये बोलताना कमिन्सने फ्रँचायझी क्रिकेटमधील आर्थिक आकर्षणाबाबत भाष्य केले होते. त्यावेळी तो म्हणाला होता की, ऍशेससारखी मोठी मालिका प्रत्येक खेळाडूसाठी महत्त्वाची असते आणि सर्वांना त्या मालिकेत खेळायचे असते.

कमिन्सने उदाहरण देताना सांगितले की, या मोसमात ऑस्ट्रेलियाचे बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामने आहेत आणि त्या काळात द हंड्रेड स्पर्धाही होणार आहे. त्यामुळे अनेक खेळाडूंनी हंड्रेडच्या लिलावातून माघार घेतली. मात्र, भविष्यात असे कायम राहीलच असे नाही, असेही त्याने स्पष्ट केले.

त्याने पुढे म्हटले की, काही खेळाडू ऑस्ट्रेलियासाठी खेळण्यास प्राधान्य देत आहेत आणि मोठ्या रकमेच्या ऑफर नाकारत आहेत. पण भविष्यात हा आर्थिक तणाव वाढू शकतो आणि त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.