देवरूख येथे ‘महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानाचा दिमाखदार समारोप
देवरूख (प्रतिनिधी):
महाराष्ट्र शासनाच्यावतीने राबविण्यात आलेल्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान (टप्पा १)” चा समारोप आज देवरुख येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाला. राज्याचे अप्पर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. १८ फेब्रुवारी ते १५ मे २०२६ या कालावधीत राबविलेल्या या अभियानाचा आज अंतिम दिवस होता.
या कार्यक्रमास आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी मनुज जिंदल उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री. खारगे यांनी महसूल विभागाच्या प्रगतीचा आढावा घेतला. ते म्हणाले, “गेल्या काही वर्षांत महसूल विभागाने अनेक कायदेशीर सुधारणा आणि ऑनलाईन सेवा सुरू केल्या आहेत. या बदलांमुळे नागरिक, शेतकरी, महिला आणि विद्यार्थी यांचे जीवनमान उंचावण्यास मोठी मदत झाली आहे. शासनाच्या सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असून, त्यासाठीच अशा प्रकारची अभियाने राबविली जात आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विविध मंडळ स्तरावर शिबिरांचे आयोजन करून महसूल विभागाशी संबंधित सेवा थेट लोकांपर्यंत पोहोचवण्यात आल्या. आजच्या समारोप कार्यक्रमात श्री. खारगे यांच्या हस्ते अनेक लाभार्थ्यांना विविध दाखले आणि सेवांचे प्रत्यक्ष वाटप करण्यात आले. केवळ महसूल सेवाच नव्हे, तर ग्रामीण पायाभूत सुविधांवरही यावेळी भर देण्यात आला. ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजने’ अंतर्गत संगमेश्वर तालुक्यातील मुरादपूर कुंभ्याचा दंड शाळा ते चाचेवाडी या रस्त्याचे भूमिपूजनही श्री. खारगे यांच्या हस्ते करण्यात आले. महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.













