ग्रामीण भागातील नेटवर्कअभावी गॅस वितरण ठप्प; आमदार प्रमोद जठार यांनी घेतली तातडीने दखल

रत्नागिरी: प्रतिनिधी 

रत्नागिरी जिल्ह्यातील गॅस एजन्सी वितरक आणि ग्राहकांना भेडसावणाऱ्या गंभीर समस्यांची नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार प्रमोद जठार यांनी तातडीने दखल घेतली आहे.

येथील शासकीय विश्रामगृह येथे रत्नागिरी जिल्हा गॅस एजन्सी वितरक असोसिएशनच्या प्रतिनिधींनी भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या उपस्थितीत आमदार जठार यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. निवेदनाद्वारे वितरकांनी सध्या भेडसावणाऱ्या प्रमुख अडचणी आमदारांसमोर मांडल्या. यामध्ये गॅसचा जाणवणारा तुटवडा आणि ऑनलाइन बुकिंग मधील समस्या यांबरोबरच सध्या ग्राहकांना ओटीपी (OTP) शिवाय सिलेंडर न देण्याच्या नियमामुळे होणाऱ्या त्रासाचा पाढा वाचण्यात आला.

कोकणातील ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्कची मोठी समस्या असल्याने ग्राहकांना वेळेवर ओटीपी मिळत नाही, ज्यामुळे त्यांना सिलेंडर देणे वितरकांना अशक्य होत आहे. ही बाब लक्षात घेऊन आमदार जठार यांनी या विषयात तात्काळ लक्ष घातले.

प्रतिनिधींची बाजू ऐकून घेतल्यानंतर आमदार प्रमोद जठार यांनी जागेवरूनच इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या वरिष्ठ अधिकारी नितू जैन आणि नागवेकर यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला. त्यांनी अधिकाऱ्यांना कोकणातील मोबाईल नेटवर्कच्या परिस्थितीची स्पष्ट कल्पना दिली. नेटवर्कअभावी ग्रामीण भागातील ग्राहकांची अडवणूक होऊ नये म्हणून ओटीपीच्या नियमात शिथिलता देण्यात यावी, असे स्पष्ट आदेश त्यांनी दिले. आमदार जठार यांच्या या तत्पर दखलीनंतर अधिकारी नागवेकर यांनी यावर तातडीने कार्यवाही करण्याचे ठोस आश्वासन दिले.

या प्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, दत्ताराम लिंगायत, मनोज लोकरे, अंकुश पिलवळकर यांच्यासह गॅस एजन्सी असोसिएशनचे प्रतिनिधी, भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. आमदार जठार यांनी घेतलेल्या या आश्वासक दखलीमुळे जिल्ह्यातील गॅस ग्राहक आणि वितरकांना लवकरच दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.