अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची महत्त्वपूर्ण घोषणा; १४ जून रोजी रंगणार पुरस्कार वितरण सोहळा
मुंबई: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती, मुंबईच्या वतीने यंदाचे विविध नाट्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांमध्ये रत्नागिरीचे सुपुत्र श्री. अमेय धोपटकर यांनी बाजी मारली असून, त्यांना ‘नाट्य परिषद युवा नाट्य पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्यांच्या या यशाबद्दल नाट्यवर्तुळातून विशेष कौतुक होत आहे.
प्रतिवर्षी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे १४ जून रोजी पुरस्कार वितरण सोहळा व कलावंत मेळावा आयोजित केला जातो. रंगभूमीवर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रंगकर्मींना या सोहळ्यात गौरवण्यात येते. अमेय धोपटकर यांच्यासह अनेक गुणी कलाकारांचा यंदा सन्मान केला जाणार आहे.
पुरस्कार वितरण सोहळा रविवार, १४ जून २०२६ रोजी दुपारी ०४.०० वाजता यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.
याच सोहळ्यामध्ये रंगभूमीवर प्रदीर्घ काळ योगदान दिलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती स्वाती चिटणीस आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना यंदाचा मानाचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे.
याव्यतिरिक्त व्यावसायिक व प्रायोगिक रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट नाटक, दिग्दर्शक, अभिनेते-अभिनेत्री, तसेच पडद्यामागील तंत्रज्ञांनाही विविध श्रेणींमध्ये पुरस्कार दिले जाणार आहेत. हा बहुचर्चित सोहळा नाट्य परिषदेच्या सर्व सभासदांसाठी आणि नाट्य रसिकांसाठी विनामूल्य खुला असणार आहे, मात्र यामध्ये काही जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत.













