BREAKING: मिरजोळे एमआयडीसीत कामगार उंचावरून कोसळला; हायव्होल्टेज वायरचा शॉक लागून गंभीर जखमी

रत्नागिरी (प्रतिनिधी):
मिरजोळे एमआयडीसी (MIDC) परिसरातील प्लॉट नंबर P-24 मध्ये वेल्डिंगचे काम करत असताना अचानक तोल जाऊन पडल्याने एक तरुण कामगार गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उंचावरून पडताना बाजूने जाणाऱ्या हायव्होल्टेज वीज वाहिनीचा धक्का लागल्याने आणि सुरक्षा तारांमध्ये अडकल्याने हा तरुण गंभीर भाजला आहे. एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे या तरुणाला वेळेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. रोशन घवाळी असे या अपघातात गंभीर जखमी झालेल्या वेल्डिंग कामगाराचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिरजोळे एमआयडीसी येथील प्लॉट नंबर P-24 मधील घरमालक अब्दुल रहमान अन्सारी यांच्या घराजवळ वेल्डिंगचे काम सुरू होते. या ठिकाणी रोशन घवाळी हा कामगार पत्रे लावण्याच्या कामासाठी उंचावर चढला होता. काम करत असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो थेट खाली कोसळला.
दुर्दैवाने, ज्या ठिकाणी तो पडला, तिथेच एफसीआय (FCI) गोडाऊनच्या भिंतीपलीकडून महावितरणची (MSEB) एक्सटेन्शन वीज वाहिनी जाते. खाली पडत असताना रोशन या हायव्होल्टेज वीज वाहिनीला स्पर्श करून खाली पडला, ज्यामुळे त्याला भीषण विजेचा धक्का (शॉक) लागला. वीज वाहिनीवरून थेट खाली पडताना, कंपाउंडला सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या काटेरी तारांच्या कुंपणात तो अडकला. वीज वाहिनीचा तीव्र शॉक लागल्यामुळे त्याची पाठ पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत होती, तर तारांमध्ये अडकल्याने पायही गंभीररीत्या फाटला. या दुहेरी अपघातात तो अत्यंत गंभीर जखमी झाला.

घटनेची माहिती मिळताच मिरजोळे एमआयडीसी अग्निशमन दलाचे जवान एका क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जवानांनी तातडीने कटरच्या साहाय्याने कंपाउंडच्या सुरक्षा तारा कापल्या आणि अडकलेल्या रोशनची सुरक्षित सुटका केली.
अग्निशमन दलाने केवळ १० मिनिटांच्या आत जखमी तरुणाला रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर युद्धपातळीवर उपचार सुरू आहेत.
या जवानांनी वाचवले प्राण
हा भीषण अपघात घडल्यानंतर अत्यंत संवेदनशील परिस्थितीमध्ये जीवाची बाजी लावत एमआयडीसी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी बचावकार्य राबवले. यामध्ये अग्निशमन दलाचे कर्मचारी आनंद राऊत, दिलीप दळवी, हर्षल आकडे, प्रमोद राठोड, यतीराज मोरे, ओम यादव, शुभम गायकवाड आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी मोलाची कामगिरी बजावली. अग्निशमन दलाच्या या तत्परतेमुळेच जखमी तरुणाला वेळेत वैद्यकीय मदत मिळणे शक्य झाले.