नांदगाव तिठा येथील वाहतूक कोंडीवर आरटीओचा कारवाईचा इशारा

बाजारदिवशी बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार 

पहिल्या रविवारी सवलत, त्यानंतर कठोर पावले उचलणार

कणकवली : तालुक्यातील नांदगाव येथे उड्डाणपुलाखाली तसेच बाजारदिवशी निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत ग्रामस्थांनी नांदगाव ग्रामपंचायतीकडे लेखी तक्रार दाखल केली होती. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेण्यात आली. बैठकीत सदर समस्येबाबत सिंधुदुर्ग आरटीओ कार्यालयाला पत्र पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आज आरटीओ अधिकारी सचिन पोलादे यांनी नांदगाव येथे प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली.

 

यावेळी नांदगाव तिठा उड्डाणपुलाखाली करण्यात येणारे बेशिस्त पार्किंग तसेच बाजारपेठेत अर्ध्या रस्त्यात उभी राहणारी वाहने यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले. यापुढे अशा वाहनचालकांवर कडक कारवाई करून दंड आकारला जाईल, असा इशारा आरटीओ अधिकाऱ्यांनी दिला.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, नांदगाव ग्रामस्थांनी रविवारी भरत असलेल्या आठवडा बाजारादिवशी निर्माण होणाऱ्या ट्रॅफिक समस्येबाबत ग्रामपंचायतीकडे तक्रार केली होती. त्यानंतर ग्रामपंचायतीने आरटीओ कार्यालय, ओरोस येथे पत्र पाठवून तीन आसनी व सहा आसनी रिक्षांसाठी अधिकृत स्टॅण्ड उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. तसेच उड्डाणपुलाखाली होत असलेल्या वाहन पार्किंगमुळे अपघाताच्या घटना घडत असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले होते. त्या पत्राच्या अनुषंगाने आरटीओ अधिकारी सचिन पोलादे यांनी नांदगाव तिठा येथे भेट देऊन सरपंच रविराज मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर, तीन आसनी व सहा आसनी रिक्षाचालक तसेच मालवाहू टेम्पो चालक – मालकांशी चर्चा केली.

 

यावेळी आरटीओ अधिकाऱ्यांनी येणाऱ्या पहिल्या रविवारी सर्व वाहन चालकांना सवलत देण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र त्यानंतर कोणतीही सवलत दिली जाणार नसून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

 

वाहनचालकांनी आपापसात समन्वय साधून ट्रॅफिकची समस्या निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. तीन आसनी व सहा आसनी रिक्षांसाठी जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेची असल्याचेही आरटीओ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

 

यावेळी आरटीओ अधिकारी सचिन पोलादे, प्रीतम जाधव, वाहनचालक श्री. कांदे, सरपंच रविराज मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर आदी उपस्थित होते.