रत्नागिरी जिल्ह्यात पुढील पाच दिवस पावसाचा इशारा; शेतकऱ्यांना विविध पिकांसाठी कृषी सल्ला

रत्नागिरी : प्रतिनिधी 

रत्नागिरी जिल्ह्यात २२ ते २७ मेदरम्यान हवामानात बदल होण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचे वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. २२ मे रोजी काही ठिकाणी मध्यम पाऊस व ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, २३ मे रोजी हलका ते मध्यम पाऊस आणि ३० ते ४० किमी प्रतितास वेगाचे वारे अपेक्षित आहेत. २७ मे ते २ जूनदरम्यान कोकणात सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांना नव्याने लावलेल्या सुपारी, नारळ, आंबा व काजू कलमांना आधार देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. खरीप हंगामासाठी दर्जेदार भात बियाण्यांची आगाऊ उपलब्धता करून घेण्याचे आवाहन करण्यात आले असून कोकणासाठी शिफारस केलेल्या विविध भात जातींचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे.

आंबा लागवडीसाठी १ बाय १ बाय १ मीटर आकाराचे खड्डे तयार करून त्यात शेणखत, कंपोस्ट आणि सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करावा. पावसाळा सुरू होताच हापूस, केसर, पायरी, रत्ना, सिंधू, कोकण राजा यांसारख्या शिफारस केलेल्या जातींची निरोगी कलमे लावावीत. नव्याने लागवड केलेल्या आंबा कलमांना सुरुवातीच्या तीन वर्षांत नियमित पाणी व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.

सुपारी लागवडीसाठी ६० × ६० × ६० सें.मी. आकाराचे खड्डे २.७ × २.७ मीटर अंतरावर तयार करून त्यात शेणखत, माती, सिंगल सुपर फॉस्फेट व कार्बारिल पावडरचे मिश्रण भरावे. सुपारीची लागवड जून महिन्यात करावी, तर पाणी साचणाऱ्या भागात ऑगस्ट–सप्टेंबरमध्ये लागवड करावी. नारळासाठी ७.५ × ७.५ मीटर अंतरावर लागवड करण्याचा सल्ला देण्यात आला असून जून-जुलै हा योग्य हंगाम असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

हळद लागवडीसाठी जमीन भुसभुशीत करून उन्हात तापू द्यावी. लागवड सरी-वरंबा पद्धतीने करून योग्य अंतर राखण्याचा सल्ला आहे. लागवडीवेळी रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा तसेच बियाणे प्रक्रिया करून रोग व किडींचा प्रादुर्भाव टाळावा, असे मार्गदर्शन करण्यात आले आहे.

दरम्यान, माती परीक्षणाबाबतही शेतकऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. तीन ते चार वर्षांतून एकदा माती परीक्षण करणे आवश्यक असून वर्षातून अनेक पिके घेणाऱ्या जमिनीचे परीक्षण दरवर्षी करावे. भात, नागली, भुईमूग यांसाठी २० ते २५ सें.मी., तर आंबा, काजू, नारळ व सुपारीसाठी ६० सें.मी. खोलीवरील मातीचे नमुने घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.