गावठाण व कोळीवाडे धरतीवर मच्छीमार नागरिकांची बांधकामे नियमित केली जाणार 

कोणीही विस्तापित होणार नाही : आमदार निलेश राणे

 

किनारपट्टीचा मच्छीमार हाच तिथला मालक हा हक्क मिळवून देण्यासाठी आम्ही कटीबद्ध

 

मालवण किनारपट्टीवरील मच्छीमार व नागरिकांना दिलासा 

 

तळाशील ग्रामस्थांच्या मागण्यांबाबतही ठोस सकारात्मक निर्णय 

 

मालवण | प्रतिनिधी : किनारपट्टीचा मच्छीमार हाच खरा तिथला मालक आहे. त्याला तो हक्क मिळवून देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. गावठाण व कोळीवाडे धरतीवर मालवण किनारपट्टीवरील मच्छीमार नागरिकांची बांधकामे नियमित केली जाणार आहेत. मालवण किनारपट्टीवरील मच्छीमार व नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सोबतच तळाशील ग्रामस्थांच्या मागण्यांबाबतही ठोस सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती आमदार निलेश राणे यांनी दिली.

 

किनारपट्टी भागातील मच्छीमार व पारंपारिक स्थानिकांची बांधकामे, सीआरझेड नोटीसा, आणि तळाशील गावातील प्रलंबित प्रश्नांवर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित महत्त्वपूर्ण बैठकीत सकारात्मक तोडगा निघाला आहे. यावेळी जिल्हाधिकारी यांनीही चांगली सकारात्मक भूमिका घेतली असेही आमदार निलेश राणे म्हणाले. तळाशील गाव समोरील बंदी क्षेत्रातील कालावल खाडीपात्रातील वाळू उपसा कायमस्वरूपी बंद होणार असून किनारपट्टीवरील मच्छीमारांच्या बांधकामांचा प्रश्न ही मार्गी लागणार आहे. ८० टक्के बांधकामे नियामाकुल होणार असून उर्वरित बांधकामे ही नियमित होण्याच्या दृष्टीने प्रयत्न व कार्यवाही सुरु आहे. कोणालाही विस्तापित केले जाणार नाही. 100 टक्के नियमित करण्याच्या दृष्टीने प्रशासन व आम्ही प्रयत्नशील असल्याचे आमदार निलेश राणे यांनी सांगितले.

 

मालवण निलरत्न निवासस्थानी पत्रकार परिषद झाली. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

 

किनारपट्टीवरील मच्छिमार व नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. येथील बहुतांश बांधकामे “शासकीय धोरणानुसार नियमित होणार आहेत. उर्वरित २० टक्के ही नियमित होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. कोणीही विस्थापित होणार नाही. कोळीवाडे आणि गावठाण विस्तार ज्या धर्तीवर मुंबईत नियमित झाले, त्याच धर्तीवर आपल्या भागातील गाबीत आणि भंडारी समाजाला जमिनीचा मालकी हक्क मिळवून देण्यासाठी आम्ही यशस्वी झालो आहोत,” असे राणे यांनी स्पष्ट केले. भविष्यात हरित लवादा मध्ये कोणी तक्रार केली तरी मच्छीमारांना त्रास होऊ नये, यासाठी हा कायमस्वरूपी तोडगा काढला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

 

“तळाशील येथील ‘नोटीफाईड स्पॉट’ असल्याने तिथे वाळू उपसा होऊच शकत नाही, याची १०० टक्के खात्री प्रशासनाने दिली आहे. तसेच अनधिकृत वाळू उपसा करून पळालेल्या दोन बोटींच्या संदर्भात मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांना तत्काळ एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत असेही त्यांनी सांगितले.

 

 

*विरोधकानी 10 वर्षात काहीच केले नाही मात्र जलसी वृत्ती कायम*

 

आमदार राणे यांनी माजी आमदारांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, “मागच्या १० वर्षात सीआरझेड आणि तळाशीलचे प्रश्न, मच्छिमार प्रश्न का सुटले नाहीत? तेव्हा का धाडस दाखवले नाही? फक्त राजकारण करणे, टीका करणे आणि ‘जलसी’ बाळगणे यापलीकडे त्यांनी काहीच केले नाही. यांच्याकडे विकासकामांवर बोलायला काही नसल्याने, १० एप्रिल हा नारायण राणे साहेब यांचा वाढदिवस आहे. त्यादिवशी मत्स्य विभागावर मोर्चा काढण्याचे राजकारण केले जात आहे. हे लोकांच्या हिताचे नसून संकुचित मनाचे दर्शन आहे. हे जनतेला माहिती आहे. एलईडी मासेमारी करणाऱ्या बोटींवर ९० लाखांचा दंड ठोठावणारा मी पहिला माणूस होतो. मी कधीही चुकीच्या कामाला पाठीशी घातलेले नाही.

विरोधकांनी राजकारण करून कितीही टीका केली तरी आम्हला फरक पडत नाही, आम्ही जनतेसोबत आहोत आणि जनतेत राहणार. आम्ही प्रत्येक विषय पारदर्शकपणे सोडवत आहोत. किनारपट्टीचा मच्छीमार हाच तिथला खरा मालक आहे आणि त्याला तो हक्क मिळवून देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत,” असा विश्वास आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केला.