दहावी परीक्षेतील गैरप्रकाराची सखोल चौकशी सुरु

भुईबावडा केंद्रावर चौकशी समिती दाखल

शिक्षण समितीच्या आदेशानंतर यंत्रणा सक्रिय

वैभववाडी प्रतिनिधी :
कॉपी प्रकरणाची गंभीर दखल पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी घेताच यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. भुईबावडा केंद्रावर या प्रकरणाची सखोल चौकशी जिल्हा परिषद शिक्षण विभाग व कोकण बोर्ड यांच्या चौकशी समितीकडून सुरु झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीत झालेल्या ठरावानुसार शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांच्या आदेशानुसार ही चौकशी सुरु झाली आहे.

मार्च 2026 रोजी भुईबावडा केंद्रावर झालेल्या दहावीच्या परीक्षेत एका विद्यार्थ्याच्या नऊ पैकी सात विषयाच्या उत्तर पत्रिकांना जोडलेल्या पुरवण्या व मूळ उत्तर पत्रिका यांच्यामध्ये हस्ताक्षराची तफावत आढळून आली आहे. या पुरवण्या दुसऱ्याच व्यक्तीने लिहिल्याचे आढळून आले आहे. यामुळे हे कॉपी प्रकरण सर्वत्र गाजत असून या गंभीर प्रकरणाची दखल लोकप्रतिनिधी पदाधिकारी घेतली आहे. वैभववाडीतील जि. प. सदस्य प्रमोद रावराणे यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीमध्ये या गंभीर प्रकरणाचा आवाज उठवला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती.
शिक्षण समिती सभापती प्रितेश राऊत यांच्या आदेशानुसार समितीने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी असे आदेश दिले होते. त्यानुसार भुईबावडा केंद्रामध्ये शुक्रवारी चौकशी सुरू झाली आहे. यामध्ये जिल्हा परिषदेकडून उपशिक्षण अधिकारी संजय माने, कोकण बोर्डाकडून निवृत्त शिक्षण अधिकारी डी.जी. साळुंखे, लिपिक गणेश भालेकर यांची नेमणूक करण्यात आली आहे.

आज दिवसभर या गंभीर प्रकरणाची चौकशी सुरू झाली असून यामध्ये केंद्र संचालक उपसंचालक सात शिक्षक व लिपिक अशा दहा जणांची चौकशी सुरू होती.

दरम्यान यासंदर्भात उपशिक्षण अधिकारी श्री माने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की या प्रकरणाची गोपनीय चौकशी सुरू असून या संदर्भातील अहवाल लवकरच जि प ला सादर करणार असल्याचे सांगितले.