मुरुड येथे एलटी लाईन ओढण्याचे काम करताना घडली दुर्दैवी घटना
दापोली(प्रतिनिधी)
दापोली तालुक्यातील मुरुड येथे एलटी लाईन ओढण्याचे काम करत असताना विजेचा धक्का लागून संकेत हरिशंद्र पवार (वय ३९, रा. गव्हे ब्राह्मणवाडी, ता. दापोली) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
याबाबत दापोली पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार , आज शुक्रवार (२२ मे) रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास मुरुड राममंदिर परिसरात एलटी लाईन ओढण्याचे काम सुरू होते. महावितरणचे वायरमन यांनी वीजपुरवठा बंद केल्याची खात्री करून त्यांनी काम सुरू केले होते.
काम सुरू असताना संकेत पवार हे इलेक्ट्रिक पोलवर काम करत होते. त्यावेळी अचानक त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला आणि ते पोलवरून खाली पडले. सोबत काम करणारे राजेंद्र गुरव व अशोक निकम यांनी त्यांना तातडीने जखमी अवस्थेत आंबवली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.
मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, दापोली येथे हलविण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून सायंकाळी ४.५० वाजता त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी सचिन हरिशंद्र पवार यांनी दिलेल्या खबरिवरून दापोली पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.












