म्हारळ गाव परिसरात मध्यरात्री घडली भीषण घटना
पोलिसांकडून तपास सुरू; हल्लेखोरांचा शोध सुरू
कल्याणजवळील म्हारळ गाव परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. एका तरुण सुपरवायझरची अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केली आहे. रवींद्र आहिरे असे मृत तरुणाचे नाव असून तो एका खासगी कंपनीत सुपरवायझर म्हणून कार्यरत होता. या घटनेनंतर परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कल्याण : ठाणे जिल्ह्यातील कल्याण जवळील म्हारळ गाव परिसरात सोमवारी रात्री उशिरा एक भीषण खूनाची घटना घडली आहे. रवींद्र आहिरे (वय 36) या तरुणाची अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करून हत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र आहिरे हे एका खासगी कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करत होते. घटनेच्या दिवशी त्यांनी रात्री सुमारे 7 वाजता त्यांच्या आईला उपचारासाठी दवाखान्यात नेऊन सुखरूप घरी आणले होते. त्यानंतर रात्री पुन्हा काही वैयक्तिक कामासाठी ते घराबाहेर पडले होते.
त्याचवेळी मलखान कंपाऊंड परिसरात आधीपासून दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोराने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. हल्लेखोराने धारदार शस्त्राने त्यांच्या पोटावर सपासप वार केले. गंभीर जखमी झाल्याने रवींद्र आहिरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे तपासले जात आहेत.
मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगर येथील रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक अंदाजानुसार वैयक्तिक वाद, आर्थिक व्यवहार किंवा पूर्ववैमनस्याची शक्यता तपासली जात आहे.
या घटनेमुळे म्हारळ गाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. टिटवाळा पोलीस पुढील तपास करत असून आरोपींचा शोध सुरू आहे.











