न्हावेली (प्रतिनिधी): श्रेयस गावडे
घोडेमुख मातोंड ते तळवडे या मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्याची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली असून वाहनधारकांना प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे. या परिसरातील सुमारे ५ किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. रस्त्यावरील डांबर उखडून जागोजागी मोठे खड्डे पडल्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनधारकांचे प्रचंड हाल होत आहेत. या गंभीर समस्येकडे संबंधित विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
मुख्य म्हणजे तळवडे ही या भागातील एक मोठी व महत्त्वाची बाजारपेठ आहे. त्यामुळे संपूर्ण पंचक्रोशीतील लोकांची, शेतकरी आणि व्यापाऱ्यांची याच मार्गावरून दिवसभर सतत ये-जा सुरू असते. दैनंदिन व्यवहार, शाळा-कॉलेज आणि वैद्यकीय सुविधांसाठी हजारो नागरिक याच रस्त्याचा वापर करतात. मात्र रस्त्याच्या या दुरवस्थेमुळे वाहन चालवणे कठीण झाले असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अवघ्या काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला असल्याने या खड्ड्यांमध्ये पाणी साचून मोठी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने कोणतीही वाट न पाहता, पावसाळा सुरू होण्यापूर्वी तातडीने या रस्त्यावरील खड्डे तरी बुजवावेत, अशी तीव्र मागणी स्थानिक ग्रामस्थ आणि वाहनधारकांमधून केली जात आहे.













