गोपाळगडाची मालकी पुन्हा वादात

आमदार जठार व उपसभापती निलेश सुर्वेंचे यांचे प्रयत्न; 3 जून रोजी बैठक

गुहागर | प्रतिनिधी
राज्य संरक्षित स्मारक अशी नोंद होवूनही गोपाळगड किल्ल्याच्या सातबाऱ्यांवर काही व्यक्तींची नावे लिहिली गेली. त्यानंतर संबधित खातेदारांनी पर्यटकांना आम्हीच गडाचे मालक असल्याचे सांगितल्याने वाद निर्माण झाला. याबाबत लक्ष घालून गोपाळगड किल्ला शासनाच्या ताब्यात घ्यावा. अशी विनंती गुहागर पंचायत समितीचे उपसभापती निलेश सुर्वे यांनी आमदार प्रमोद जठार यांना केली. त्याची दखल घेत 3 जूनला आमदार जठार यांनी जिल्हाधिकाऱी रत्नागिरी यांच्यासह पुरातत्व विभाग अधिकारी यांची बैठक निश्चित केली आहे.

मे महिन्यात गुहागरात येणारे अनेक पर्यटक गोपाळगड या किल्ल्याला भेट देतात. बदलापुरचे सागर पवार आणि कुटुंब 26 मे रोजी गोपाळगड किल्ल्यावर गेले. किल्ला पहाताना त्यांनी आमराईत जमिनीवर पडलेले आंबे उचलले. त्यावेळी या पर्यटकांना एका स्थानिकाने हटकले. हा गड आमच्या मालकीचा आहे असे सांगितले. या संदर्भातील व्हिडिओ प्रसारमाध्यमांतून व्हायरल झाला आणि गोपाळगडप्रेमी संतप्त झाले.