मंथन अजून मोठा हो, लागणारी सर्वतोपरी मदत करू!
पालकमंत्री नितेश राणेंची मंथन उकर्डे व कुटुंबीयांना ग्वाही!
कणकवली : कणकवली तालुक्यातील 12 वर्षीय मंथन पराग उकर्डे याने आशियाई ट्रॅम्पोलिन स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. चीनच्या हाँगकाँग येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई ट्रॅम्पोलिन स्पर्धेत मंथनने सहावे स्थान मिळवत जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
या स्पर्धेसाठी प्रत्येक वयोगटातून देशभरातून केवळ दोन खेळाडूंची निवड करण्यात आली होती. 12 वर्षांखालील गटातून भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मंथन उकर्डे याला मिळाली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत त्याने उत्कृष्ट कामगिरी करत भारतासह सिंधुदुर्ग जिल्ह्याचा गौरव वाढवला.
मंथनच्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री Nitesh Rane यांची मंथन व त्याच्या कुटुंबीयांनी कणकवली येथील ‘ओम गणेश’ निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मंथनची आई व आजी उपस्थित होत्या.
हाँगकाँग येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लागणाऱ्या खर्चासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी मंथनला आर्थिक मदत करून मोलाचे सहकार्य केले होते. या मदतीमुळे मंथनला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली. स्पर्धेत यश मिळवून भारतात परतल्यानंतर मंथन आणि त्याच्या कुटुंबीयांनी पालकमंत्र्यांची भेट घेत त्यांचे आभार मानले.
यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी मंथनचे अभिनंदन करत आगामी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच त्याच्या भावी क्रीडा कारकिर्दीसाठी आवश्यक ती सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली.
मंथनच्या या यशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाची भर पडली असून, त्याच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.













