पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात गर्भलिंग निदानाच्या गंभीर प्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे. पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या माध्यमातून महिलांच्या घरी जाऊन बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या तपासणीसाठी संबंधितांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जात असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात बोगस डॉक्टरांसह काही वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली असून आणखी काही संशयितांचा शोध सुरू आहे.
सात ते आठ डॉक्टरांशी संपर्क असल्याचा संशय
दौंड : गर्भलिंग निदानासंदर्भातील एक व्हिडिओ समोर आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली. दौंडचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन गुजर यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान हे जाळे केवळ एका भागापुरते मर्यादित नसून त्याचे विस्तृत नेटवर्क असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात सात ते आठ डॉक्टरांशी संपर्क असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, परिसरात अधिकृत सोनोग्राफी केंद्रे कार्यरत असली तरी संबंधित आरोपी संपूर्ण यंत्रणेच्या बाहेर राहून काम करत होता. एजंटांच्या माध्यमातून तो थेट गर्भवती महिलांच्या घरी पोहोचत असे आणि तेथेच पोर्टेबल सोनोग्राफी मशीन वापरून गर्भलिंग तपासणी करत असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे त्याची कोणतीही अधिकृत नोंद उपलब्ध नव्हती.
मुख्य आरोपी अटकेत; आणखी काही जण फरार
यवत पोलीस ठाण्याचे निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, केडगाव परिसरात गर्भलिंग निदान केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर तपासाची दिशा स्पष्ट झाली. तपासादरम्यान अण्णासाहेब गिरी हा कोणतीही वैद्यकीय पदवी नसलेला बोगस डॉक्टर असल्याचे निष्पन्न झाले. तो पोर्टेबल मशीनच्या मदतीने गर्भलिंग निदान करत असल्याचे आढळून आले आहे.
या कारवाईदरम्यान संबंधित सोनोग्राफी मशीन जप्त करण्यात आले. तपासात काही डॉक्टरांच्या मदतीने गर्भलिंग निश्चित झाल्यानंतर गर्भपात केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणात डॉ. अतुल जाधव यांची भूमिका समोर आल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय आणखी दोन डॉक्टरांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून ते सध्या फरार आहेत.
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांत सुमारे 500 गर्भपातांची नोंद संशयास्पद स्वरूपात आढळून आली आहे. त्यामुळे या संपूर्ण रॅकेटची व्याप्ती मोठी असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. संबंधित महिलांपर्यंत पोहोचून अधिक माहिती गोळा करण्याचे काम सुरू असून पोलिसांनी नागरिकांना या प्रकरणासंदर्भात कोणतीही माहिती असल्यास पुढे येण्याचे आवाहन केले आहे.











