जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य : नागरिकांना सहभागाचे आवाहन
सावंतवाडी । प्रतिनिधी :
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून उद्या शुक्रवारी ५ जून रोजी वनविभाग आणि सावंतवाडी वन परिक्षेत्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वनसंवर्धन-आपले कर्तव्य’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेच्या माध्यमातून पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धनाचा संदेश घराघरांपर्यंत पोहोचवण्याचा वनविभागाचा मानस आहे.
’एकच ध्येय – स्वच्छ पर्यावरण, निरोगी जीवन’ असा महत्त्वपूर्ण नारा देत यावर्षी सावंतवाडी येथील ऐतिहासिक आणि निसर्गरम्य नरेंद्र डोंगर परिसराची निवड करण्यात आली आहे. या मोहिमेत नरेंद्र डोंगरावरील प्लास्टिक कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावली जाणार आहे. प्लास्टिक मुक्तीच्या या मोहिमेसोबतच डोंगरावर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणही केले जाणार आहे, ज्यामुळे परिसराची हिरवळ आणि जैवविविधता टिकून राहण्यास मदत होईल.
हा विशेष कार्यक्रम शुक्रवारी सकाळी ठीक ९ वाजता नरेंद्र डोंगर, सावंतवाडी येथे सुरू होईल. केवळ शासकीय पातळीवर नव्हे, तर लोकसहभागातूनच पर्यावरण रक्षण शक्य आहे, ही भावना ठेवून वनविभागाने या मोहिमेचे आयोजन केले आहे.
आपल्या आरोग्यासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी नागरिकांनी या उपक्रमात सक्रीय सहभाग घ्यावा. सावंतवाडीकरांनी सकाळी नऊ वाजता नरेंद्र डोंगरावर उपस्थित राहून पर्यावरण संवर्धनाच्या या कार्यात आपले बहुमूल्य योगदान द्यावे, असे आवाहन वनविभाग आणि सावंतवाडी वन परिक्षेत्राच्या वतीने करण्यात आले आहे.










