टक्केवारीसाठी ठेकेदारांचे लाड नको : सीईओ रवींद्र खेबुडकर यांनी अधिकाऱ्यांना सुनावले

अडचणी असल्यातरी जलजीवन योजना पूर्ण करावीच लागेल

वैभववाडी येथे जलजीवन मिशन योजना आढावा बैठक संपन्न

वैभववाडी प्रतिनिधी :
जलजीवन योजनेत अनेक अडचणी असल्यातरी सदर योजना आपल्याला पूर्ण करावीच लागेल. संबंधित यंत्रणेने यात अधिक लक्ष घालून त्रुटी दूर करून योजना कार्यान्वित कराव्यात. टक्केवारीच्या मोहापायी अधिकाऱ्यांनी ठेकेदाराचे लाड करू नये. संबंधित ठेकेदार काम करत नसल्यास त्यांना काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाका. अशा सक्त सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर यांनी दिल्या. किरकोळ कारणामुळे काही योजना अपूर्ण आहेत हे अधिकाऱ्यांचे अपयश आहे असेही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सुनावले.
वैभववाडी तालुका जलजीवन मीशन योजना व पाणीटंचाई आराखडा आढावा बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या उपस्थितीत पार पडली.
यावेळी पंचायत समिती सभापती सिद्धेश रावराणे, उपसभापती साची कोलते, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे, श्रावणी रावराणे, रिद्धी सुतार, पंचायत समिती सदस्य देवानंद पालांडे, मंगेश लोके, सुवर्णा संसारे, गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ, संबंधित विभागांचे अधिकारी, सरपंच आणि ग्रामसेवक उपस्थित होते.
मान्सून अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असताना तालुक्यातील पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी ४ जून रोजी बैठक घेण्यात येत आहे. पाणीटंचाईचे नियोजन डिसेंबर महिन्यापासून व्हायला हवे होते. मात्र जून महिन्यात आढावा घेतला जात असल्याने ही अत्यंत गंभीर बाब असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे यांनी केला. तालुक्यातील जलजीवन मिशनच्या कामांचा पुरता बोजवारा उडाला असून त्याला प्रशासनच जबाबदार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे ही कामे रखडली आहेत. अपूर्ण कामांमुळे सरपंच आणि ग्रामसेवकांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागत असून संबंधित ठेकेदार मात्र नामानिराळे असल्याचे रावराणे यांनी सांगितले.
पंचायत समिती सदस्य देवानंद पालांडे यांनीही चर्चेत सहभाग घेतला. जलजीवन मिशनची कामे केवळ ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना जबाबदार धरून पूर्ण होणार नाहीत. ५४ पैकी १९ योजनांचे सुधारित (रिव्हाईज) प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. त्यांना मंजुरी का मिळत नाही आणि त्याचे अधिकार नेमके कोणाकडे आहेत, हे स्पष्ट करावे, अशी मागणी देवानंद पालांडे यांनी केली.
निवडून आल्यापासून गटविकास अधिकाऱ्यांनी आम्हाला कधीही विश्वासात घेतले नाही. आम्ही सुचविलेली कामे घेतली जात नाहीत. आमची एवढी अॅलर्जी का ? असा संतप्त सवाल प्रमोद रावराणे यांनी केला.
दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी खेबुडकर यांनी जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या सर्व कामांचा ग्रामपंचायतनिहाय आढावा घेत कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.