मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत लोरे नं. १ ग्रामपंचायतीचे जिल्हास्तरीय मूल्यमापन

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या समितीकडून विकासकामांची पाहणी; उपक्रमांबाबत समाधान व्यक्त

कणकवली, प्रतिनिधी :
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत जिल्हास्तरीय मूल्यमापनासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या समितीने गुरुवारी लोरे नं. १ ग्रामपंचायतीला भेट देऊन विविध विकासकामे व उपक्रमांची पाहणी केली. अभियान कालावधीत राबविण्यात आलेल्या उपक्रमांबाबत समितीने समाधान व्यक्त करत ग्रामपंचायतीच्या कार्याची दखल घेतली.

जिल्हा परिषद कोल्हापूरच्या मूल्यमापन समितीच्या अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांच्या नेतृत्वाखाली समितीने पंचायत समिती कणकवली अंतर्गत केंद्रीत ग्रामपंचायतींच्या मूल्यमापनाचा आढावा घेतला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) जयवंत उगले, प्रकल्प संचालक माधुरी परीट, कार्यकारी अभियंता अर्जुन गोळे, वरिष्ठ पत्रकार समीर देशपांडे, विस्तार अधिकारी रविंद्र कुंभार, सचिन शिरदवाडे, लक्ष्मण पाचगावे, शुभम राऊत आदी सदस्य उपस्थित होते.

समितीचे स्वागत सरपंच अजय तुळशीदास रावराणे यांनी केले. यावेळी गट विकास अधिकारी अरुण चव्हाण, सहाय्यक गट विकास अधिकारी मंगेश वालावलकर, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग व रामचंद्र शिंदे हेही उपस्थित होते.
सरपंच अजय रावराणे यांनी १७ सप्टेंबर २०२५ ते ३१ मार्च २०२६ या अभियान कालावधीत ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात आलेल्या विविध विकासकामे, लोकसहभागातून झालेले उपक्रम, स्वच्छता, पाणीपुरवठा, पर्यावरण संवर्धन व ग्रामविकासाशी संबंधित योजनांची सविस्तर माहिती समितीसमोर सादर केली.

यानंतर समितीने ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील विविध उपक्रमांना प्रत्यक्ष क्षेत्रीय भेटी देऊन पाहणी केली. श्री गांगोचाळा मंदिर परिसरात डॉ. जॅसमिन यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. विविध विकासकामे, सुविधांची उपलब्धता आणि ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीची पाहणी केल्यानंतर समितीने समाधान व्यक्त केले.

या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे, उपसरपंच रसिका रविंद्र राणे, ग्रामपंचायत सदस्य नरेश गुरव, सुप्रिया रावराणे, पोलिस पाटील सुनील मधुकर रावराणे, अमित अनंत रावराणे, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, आरोग्य उपकेंद्रातील अधिकारी व कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांनी समितीच्या भेटीदरम्यान आवश्यक सहकार्य करून ग्रामपंचायतीच्या विकासकामांची माहिती दिली.