देवगड : शासनाच्या ‘निक्षय मित्र’ उपक्रमाला हातभार लावत श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट, कुणकेश्वर यांच्या वतीने देवगड तालुक्यातील क्षयरुग्णांना पोषण आहारासाठी मोफत धान्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
क्षयरोगमुक्त भारत अभियानाला बळकटी देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम सोमवार, दि. ८ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता श्री देव कुणकेश्वर मंदिर परिसरात होणार आहे. या उपक्रमांतर्गत देवगड तालुक्यातील क्षयरुग्णांना पौष्टिक आहारासाठी धान्याचे किट मोफत वितरित करण्यात येणार असून, रुग्णांच्या आरोग्य पुनर्प्राप्तीसाठी आवश्यक पोषण सहाय्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
कार्यक्रमास जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. जयवंत मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अजित दब्बे, वैद्यकीय अधिकारी डॉ. कपिल मेस्त्री, डॉ. मेहुल जाधव, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक श्री. सुहास कांबळे तसेच कुणकेश्वर ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. महेश तांबणकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या उपक्रमासाठी तालुका आरोग्य कार्यालय, देवगड तसेच जिल्हा क्षयरोग कार्यालय, सिंधुदुर्ग यांचे सहकार्य लाभले आहे. क्षयरुग्णांना पोषण आहार उपलब्ध करून देत उपचार प्रक्रियेला अधिक प्रभावी बनविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
देवगड तालुक्यातील पात्र क्षयरुग्णांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.











