कॉर्पोरेट जिहादवर आज चिपळूण येथे विशेष संवाद

हिंदू जनजागृती समितीतर्फे आयोजन
आ. निलेश राणेंसह राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे, प्रीती राऊत यांची उपस्थिती

चिपळूण (प्रतिनिधी) : नाशिकमध्ये घडलेल्या कथित ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर समाजात जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हिंदू जनजागृती समितीतर्फे ८ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजता शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात ‘कॉर्पोरेट जिहाद आणि नक्की सत्य काय?’ या विषयावर विशेष संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समितीचे हेमंत चाळके आणि नगरसेवक निहार कोवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले की, नाशिकमधील कार्पोरेट कंपनीतील प्रकरणाच्या अनुषंगाने कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या तरुण-तरुणींच्या सुरक्षिततेसह विविध सामाजिक प्रश्न निर्माण झालेले आहे. त्यामुळे समितीने बेटी सुरक्षित, राष्ट्र सुरक्षित अभियान सुरू केले आहे. या अभियानातर्गत ‘कार्पोरेट’ जिहाद’ या विषयावर कोकणातील पहिला विशेष संवाद येथे आयोजित करण्यात आलो आहे. कार्पोरेट कंपनीतील घडणाऱ्या अशा प्रकरणांच्या अनुषंगाने या क्षेत्रात काम करणाऱ्या तरुण-तरुणींच्या सुरक्षिततेसह विविध सामाजिक विषयांवर या कार्यक्रमात चर्चा होणार आहे. या कार्यक्रमात सिंधुदुर्गतील शिवसेनेचे आमदार नीलेश राणे, प्रखर हिंदुत्ववादी सामाजिक कार्यकर्त्या अॅड. प्रिती राऊत आणि हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे मार्गदर्शन करणार आहेत. संबंधित विषयावरील वास्तव, विविध पैलू आणि त्यावरील उपाययोजनांबाबत उपस्थितांना माहिती देण्यात येणार असल्याने या कार्यक्रमाला समाजातील महिला, पालक, युवक-युवती तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन हेमंत चाळके, निहार कोवळे यांच्याकडून करण्यात आले आहे.
यावेळी हिंदू जनजागृती समितीचे अनुराग उतेकर, परिमल भोसले, प्रशांत उतेकर, सुरज कदम, विक्रम जोशी, राजेश ओतारी, अनंत काळे तसेच समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.