नाम फाउंडेशनच्या समाजोपयोगी उपक्रमांसह नदी संवर्धन व जलसंधारणावर चर्चा
चिपळूण (प्रतिनिधी) : गणेशोत्सवाच्या मंगलमय पर्वानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी ज्येष्ठ सिनेकलावंत आणि सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी नाना पाटेकर यांच्यासोबत विविध सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
नाना पाटेकर यांच्या पुढाकारातून नाम फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यातील विविध भागांत जलसंधारण, नदी संवर्धन आणि समाजोपयोगी कामे सुरू आहेत. या कामांचा अनुभव चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघात कशा पद्धतीने उपयोगात आणता येईल, याबाबत यावेळी सकारात्मक विचारविनिमय झाला. चिपळूण-संगमेश्वर परिसराला नद्या आणि जलस्रोतांची समृद्ध परंपरा लाभली आहे. मात्र, पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे निर्माण होणारी पूरस्थिती, नदीपात्रातील गाळ आणि पाण्याच्या प्रवाहातील अडथळे ही महत्त्वाची आव्हाने आहेत. या पार्श्वभूमीवर नदीतील गाळ काढणे, नदीपात्राचे संवर्धन, जलप्रवाह सुरळीत करणे तसेच पावसाचे पाणी अडवून त्याचा प्रभावी वापर करण्यासाठी जलसंधारणाची कामे हाती घेण्याबाबत चर्चा झाली. नदी संवर्धनाची कामे केवळ प्रशासकीय पातळीवर न करता त्यामध्ये स्थानिक ग्रामस्थ, सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचा सहभाग वाढविण्याची गरजही यावेळी व्यक्त करण्यात आली. स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून गाळ उपसा, लघु बंधारे, पाणी अडविणाऱ्या संरचना आणि जलस्रोत पुनरुज्जीवनासारखे उपक्रम राबविण्याच्या शक्यतांवरही विचारमंथन झाले.
आमदार शेखर निकम यांनी मतदारसंघातील नदी संवर्धन आणि जलसंधारणाच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करण्याची भूमिका व्यक्त केली. समाजहित आणि पर्यावरण संवर्धनासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांना स्थानिक पातळीवर अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी भविष्यात समन्वयाने काम करण्याबाबत सकारात्मक वातावरण या भेटीत निर्माण झाले. गणरायाच्या दर्शनासोबतच समाजोपयोगी आणि पर्यावरण संवर्धनाच्या विषयांवर झालेली ही भेट महत्त्वपूर्ण ठरली. जलस्रोतांचे संवर्धन आणि भावी पिढ्यांसाठी पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी लोकसहभागातून प्रभावी उपक्रम राबविण्याचा संदेश या भेटीतून अधोरेखित झाला.












