▪️मसुरेत मोफत भात बियाणे वाटप करून घालून दिला आदर्श
मसुरे | झुंजार पेडणेकर : दिवसेंदिवस प्रगत शेतकऱ्यांची आधुनिक शेतीकडे वाटचाल सुरू आहे. हीच बाब लक्षात घेऊन, कमीत कमी पेरणीत अधिक दर्जेदार भातपीक मिळावे या उदात्त हेतूने मसुरे देऊळवाडा गावठणवाडी येथील ‘वंडर बॉईज मंडळा’ कडून एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. मंडळाच्या वतीने गावातील ४० पेक्षा जास्त शेतकऱ्यांना विशेष प्रक्रिया केलेल्या संकरित निर्भेळ भात बियाण्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
सध्याच्या आधुनिक युगात शेतीतील उत्पादकता वाढवणे गरजेचे झाले आहे. वंडर बॉईज मंडळाने शेतकऱ्यांना थेट बांधावर मदत करत, विशेष प्रक्रिया केलेली बियाणे उपलब्ध करून देऊन समाजासमोर एक वेगळा आणि आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. गावातील ४० हून अधिक शेतकरी बांधवांनी या उपक्रमाचा उत्स्फूर्त लाभ घेतला.
या बियाणे वाटप कार्यक्रमाप्रसंगी गावचे ग्रामपंचायत अधिकारी प्रकाश सुतार, ग्रामस्थ सौ. दीपिका परब, यशवंत परब, महेश बागवे, एकनाथ बागवे, स्वप्निल बागवे, राजेंद्र तांबे, सिद्धेश बागवे, विलास बागवे, अमित तांबे, विनोद तांबे यांच्यासह वंडर बॉईज मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते. मंडळाच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.










