‘डिजिटल अटक’च्या धाकाने रत्नागिरीतील वृद्धाला १.२३ कोटींचा गंडा; मुख्य सूत्रधार नोएडा येथून जेरबंद!

रत्नागिरी । प्रतिनिधी : केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी असल्याचे भासवून आणि ‘डिजिटल अटक’ (Digital Arrest) केल्याची भीती दाखवून रत्नागिरीतील एका नागरिकाला तब्बल १ कोटी २३ लाख रुपयांना लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीचा रत्नागिरी सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार गगनदीप भारद्वाज याला दिल्ली-नोएडा परिसरातून अत्यंत शिताफीने सापळा रचून ताब्यात घेण्यात आले आहे. न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणातील फिर्यादी श्री. मकरंद जोशी यांच्याशी आरोपींनी संपर्क साधून आपण पोलीस अधिकारी, सीबीआय आणि केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी बोलत असल्याचे भासविले. जोशी यांच्या नावाने बनावट बँक खाते उघडून त्याद्वारे मानवी तस्करी व मनी लॉन्डरिंगसारखे गंभीर गुन्हे घडल्याचा खोटा आरोप आरोपींनी केला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा बहाणा करून जोशी यांना २४ तास ‘डिजिटल अटक’ अंतर्गत सतत देखरेखीखाली ठेवण्यात आले. या कथित कायदेशीर तपासातून मुक्तता करण्यासाठी आणि “सिक्युरिटी डिपॉझिट” म्हणून आरोपींनी जोशी यांना वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण ₹१,२३,००,०००/- (एक कोटी तेवीस लाख) जमा करण्यास भाग पाडले.

सायबर पोलिसांनी जेव्हा या पैशांच्या व्यवहारांचा तांत्रिक मागोवा घेतला, तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. फसवणुकीची ही रक्कम एका चॅरिटेबल ट्रस्टच्या बँक खात्यात वळवण्यात आली होती. या ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना “CSR फंड” मिळवून देण्याचे आमिष दाखवून उत्तर प्रदेशात बोलावण्यात आले होते. तिथे त्यांना ओलीस (बंधक) ठेवून, धमकावून त्यांच्या बँक खात्यांचे धनादेश व माहिती बळजबरीने घेण्यात आली आणि त्याद्वारे ₹१,०४,००,०००/- (एक कोटी चार लाख) रकमेचा डिजिटल अपहार करण्यात आला.
सायबर पोलिसांची दिल्ली-नोएडामध्ये धडक कारवाई
बँक खात्यांचे विश्लेषण, तांत्रिक तपास आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मुख्य सूत्रधार गगनदीप भारद्वाज हा नोएडा (उत्तर प्रदेश) येथे असल्याची खात्री पोलिसांना झाली. सायबर पोलिसांच्या पथकाने तातडीने दिल्ली-नोएडा परिसरात सापळा रचून त्याला अटक केली. या गुन्ह्यात यापूर्वीच एका आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याचा जामीन न्यायालयाने फेटाळल्याने तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणातील इतर संशयितांचा शोध आणि पुढील तपास सुरू आहे.

पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक स्मिता सुतार, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार जाधव, पोलीस हवालदार संदीप नाईक आणि पोलीस कॉन्स्टेबल सौरभ कदम यांच्या तपास पथकाने ही यशस्वी कामगिरी केली.