मुंबई येथे ना. योगेशदादा कदम यांच्या हस्ते होणार गौरव
खेड (प्रतिनिधी) : शिक्षण, साहित्य आणि पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे खेडचे आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पत्रकार दिलीप स. देवळेकर यांची प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय ‘कोकण भूषण’ पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे खेड तालुक्यासह संपूर्ण कोकणातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कोकण दीप मासिकाच्या २४ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष पुरस्कार वितरण सोहळ्यात श्री. देवळेकर यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. रविवार, १४ जून २०२६ रोजी मुंबई येथील दादर परिसरातील प्रा. सुरेंद्र गावस्कर सभागृह, मुंबई मराठी संग्रहालय इमारतीत हा भव्य सोहळा पार पडणार आहे.
या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तसेच औषध प्रशासन विभागाचे राज्यमंत्री ना. योगेशदादा कदम यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख सुधीरभाऊ कदम, ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुकृत खांडेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
श्री. दिलीप देवळेकर हे दै. रत्नागिरी टाइम्सचे पत्रकार असून अधिस्वीकृती समिती, महाराष्ट्र शासनाच्या कोकण विभागीय समितीचे सदस्य, महाराष्ट्र शासनाचे विशेष कार्यकारी अधिकारी तसेच कोकण मराठी पत्रकार संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळत आहेत. पत्रकारितेतील अभ्यासपूर्ण लेखन, सामाजिक भान आणि लोकहिताच्या प्रश्नांवरील सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळे त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
पत्रकारितेबरोबरच सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्रातही त्यांनी भरीव योगदान दिले असून त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्रातील विविध संस्था तसेच शासनाकडून त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
कोकण दीप मासिकाच्या वर्धापनदिनानिमित्त महाराष्ट्रातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक आणि पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येत असून त्यामध्ये श्री. दिलीप देवळेकर यांची ‘कोकण भूषण’ पुरस्कारासाठी झालेली निवड ही खेड आणि कोकणसाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.
या पुरस्काराच्या घोषणेनंतर विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांकडून श्री. देवळेकर यांचे अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.












