विलवडे रेल्वे स्टेशन समस्यांच्या विळख्यात, प्रवाशांची होतेय गैरसोय

प्रवाशांचे मागणी आणि समस्या दूर कराव्यात अन्यथा आंदोलन- अमोल रेडीज यांचा इशारा

लांजा (प्रतिनिधी) तालुक्याच्या पुर्व भागातील विलवडे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची नियमित गर्दी होत असते .मात्र सद्यस्थितीत हे रेल्वे स्टेशन समस्यांच्या विळख्यात असून प्रवाशांची मागणी आणि समस्या दूर कराव्यात अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विलवडे रेल्वे स्टेशन प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अमोल रेडीज यांनी दिला आहे.
तालुक्याच्या पूर्व भागात विलवडे या ठिकाणी असलेले विलवडे रेल्वे स्टेशन हे लांजा तालुक्याच्या पूर्व भागासह राजापूर येथील काही पाचलसह काही भागातील रेल्वे प्रवाशांसाठी नेहमीच सोयीचे आणि उपयुक्त ठरले आहे. दररोज या रेल्वे स्थानकावरून हजारो प्रवासी ये-जा करत असतात. मात्र या ठिकाणी प्रवाशांच्या दृष्टीने मात्र गैरसोयीच आहेत .याबाबत बोलताना विलवडे रेल्वे स्टेशन प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अमोल रेडीज यांनी सांगितले की ,या रेल्वे स्टेशन ठिकाणी अनेक गैरसोयी आहेत .या ठिकाणी प्रवाशांसाठी उपयुक्त शेड नाही. तर पेअरब्लॉक नसल्याने चिखलातून वाट तुडवावी लागते .तसेच ज्येष्ठ नागरिकांना जिन्याने वर चढत जावे लागते. त्यामुळे त्यांची पूरती दमछाक होते .

लांजा तालुक्यातील आडवली, विलवडे, निवसर आणि वेरवली ही चार रेल्वे स्टेशन असून त्यापैकी विलवडे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची नेहमीच गर्दी होत असते. त्यामुळे या ठिकाणी नेत्रावत्री एक्सप्रेस आणि मांडवी एक्सप्रेस यांना थांबा मिळावा अशी देखील प्रवाशांची मागणी आहे .मात्र त्या दृष्टीने प्रशासनाकडे पत्र व्यवहार देखील केला आहे .मात्र तरी देखील प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे रेल्वे स्टेशन या ठिकाणी असलेल्या शेडमध्ये एकही पंखा नाही .त्यामुळे येथील प्रवाशांना गरमीला समोर जावे लागते.अशाप्रकारे असणाऱ्या विविध गैरसोयी समस्यांबाबत रेल्वे प्रशासनाने या समस्या तातडीने मार्गी लावून प्रवाशांचो होणारी गैरसोय दूर करावी. अन्यथा प्रवासी वर्गासह या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विलवडे रेल्वे स्टेशन प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अमोल रेडीज यांनी दिला आहे.