Beed: परळीत तुकाराम मुंढे यांच्या कारवाईची दहशत; पथक आल्याच्या चर्चेने अवैध पानटपऱ्या बंद

 

बीड : बीडच्या परळी शहरात आज सकाळपासूनच आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पथकाच्या आगमनाची चर्चा रंगली आणि त्याचा परिणाम थेट शहरातील अवैध व्यवसायांवर दिसून आला. कारवाईच्या भीतीने शहरातील अनेक विनापरवाना पानटपऱ्या आणि लहान व्यावसायिक आस्थापना बंद ठेवण्यात आल्याचे चित्र पाहायला मिळाले.

राज्यात विविध ठिकाणी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलेल्या धडक कारवायांमुळे आधीच व्यावसायिकांमध्ये धास्तीचे वातावरण आहे. त्यातच परळीत त्यांच्या पथकाच्या भेटीची चर्चा सुरू झाल्याने अनेकांनी खबरदारीचा उपाय म्हणून दुकाने बंद ठेवण्याचा मार्ग स्वीकारला.

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यापूर्वीच राज्यभरातील व्यावसायिकांना विनापरवाना व्यवसाय करू नये, तसेच भेसळयुक्त वस्तूंची विक्री टाळावी; अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर परळी शहरातही विनापरवाना सुरू असलेल्या अनेक पानटपऱ्या बंद दिसून आल्या.

दरम्यान, प्रत्यक्ष अधिकृत कारवाई झाली की केवळ चर्चेमुळे हा परिणाम झाला, याबाबत प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.