रायगड जिल्ह्यातील पीएमश्री जिल्हा परिषद शाळा, वहाळ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीदरम्यान एक अनोखा आणि प्रेरणादायी प्रसंग घडला. इयत्ता चौथीतील विद्यार्थिनी यशश्री मिठू घुले हिने मुख्यमंत्र्यांची थेट मुलाखत घेत आपल्या आत्मविश्वासाने उपस्थितांची मने जिंकली.नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पनवेल तालुक्यातील पीएमश्री जिल्हा परिषद शाळा, वहाळ येथे भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना इयत्ता चौथीत शिकणाऱ्या यशश्री घुले हिला मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली.शिक्षिका साधना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशश्रीने अत्यंत आत्मविश्वासाने मुख्यमंत्र्यांना विविध प्रश्न विचारले. “सर, आपले नाव काय?” या निरागस प्रश्नाने संवादाची सुरुवात झाली. त्यानंतर तिने मुख्यमंत्र्यांच्या सामाजिक, राजकीय आणि वैयक्तिक प्रवासाबाबत प्रश्न विचारत मुलाखत रंगवली.
“आपल्या प्रवासाची सुरुवात कशी झाली?” या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी विद्यार्थी चळवळीतून सार्वजनिक जीवनात प्रवेश केल्याचे सांगितले. तसेच समाजकार्यातील आव्हाने, त्यावर मात करण्यासाठी लागणारी जिद्द आणि छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांतून मिळालेली प्रेरणा याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यशश्रीच्या प्रत्येक प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी संयमाने आणि आपुलकीने उत्तरे दिली. मुलाखतीच्या शेवटी यशश्रीने विचारलेल्या “तुमच्या आयुष्यातील सर्वात प्रेरणादायी अनुभव कोणता?” या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, “माझ्या आयुष्यात अनेक प्रेरणादायी अनुभव आले आहेत; मात्र आज तू घेतलेली ही मुलाखत माझ्या कायम स्मरणात राहील.”मुख्यमंत्र्यांच्या या उत्तरानंतर उपस्थितांमध्ये हास्याची लाट पसरली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.
मुलाखतीचा समारोप करत यशश्रीने मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी तिच्या आत्मविश्वासाचे विशेष कौतुक करत तिच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.जिल्हा परिषद शाळेतील एका विद्यार्थिनीने दाखवलेला आत्मविश्वास, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि शाळेतील सकारात्मक शैक्षणिक वातावरण यामुळे हा प्रसंग सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला. वहाळ शाळेतील चिमुरडी यशश्री आणि तिची ही आगळीवेगळी मुलाखत उपस्थितांच्या कायम स्मरणात राहणारी ठरली.










