महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी ॲड. दीपक पटवर्धन यांची बिनविरोध निवड

कोकणाला बहुमान : जिल्हाध्यक्ष सुनील राऊळ यांच्याकडून अभिनंदन 

सावंतवाडी । प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच पुणे येथील फेडरेशनच्या कार्यालयात संपन्न झाली. यामध्ये रत्नागिरी फेडरेशनचे अध्यक्ष व महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष म्हणून यापूर्वी कार्यभार सांभाळलेले रत्नागिरी येथील कायदेतज्ज्ञ ॲड. दीपक पटवर्धन यांची महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ही निवड कोकणासाठी एक खूप मोठा बहुमान असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष श्री. सुनील राऊळ यांनी दिली.

या निवडणुकीप्रसंगी स्वतः पुणे येथे उपस्थित राहून ॲड. दीपक पटवर्धन यांना पुष्पगुच्छ देऊन प्रत्यक्ष अभिनंदन करता आले, असे श्री. सुनील राऊळ यांनी आवर्जून सांगितले. पटवर्धन हे कायदेतज्ज्ञ असून त्यांचा सहकारी पतसंस्था क्षेत्राचा गाढा अभ्यास आहे. या चळवळीत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात सातत्याने मोठे योगदान दिले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली भविष्यात ही चळवळ अधिक भक्कम होईल, असा विश्वास राऊळ यांनी व्यक्त केला.

संपूर्ण महाराष्ट्रात पतसंस्था चळवळ अतिशय व्यापक स्वरूपात कार्यरत असून, जवळपास १९ हजार पतसंस्थांच्या माध्यमातून ती सर्वसामान्य जनतेशी खोलवर जोडली गेली आहे. गेल्या १० ते १५ वर्षांत या चळवळीला संघटित स्वरूप देऊन अधिक वृद्धिंगत करण्याचे प्रयत्न राज्य स्तरावर झाले आहेत.

पतसंस्थांसमोर असणारे कर्ज वसुलीचे प्रश्न, आयकर कायद्यासंदर्भातील समस्या, ठेवीदारांच्या ठेवींचे संरक्षण करण्यासाठीच्या उपाययोजना, नवनवीन तंत्रज्ञानाचे आव्हान आणि आजच्या स्पर्धात्मक युगात निकोप स्पर्धेसाठी सुयोग्य मार्गदर्शन, अशा विविध पातळ्यांवर राज्य व जिल्हा फेडरेशन सातत्याने कार्यरत राहिले आहे. राज्य फेडरेशनने आगामी काळात अधिक जोमाने काम करावे आणि जनमानसातील पतसंस्थांची प्रतिमा अधिक विश्वासार्ह बनवावी, या दृष्टीने सर्वच जिल्हा फेडरेशन प्रयत्नशील आहेत.

अध्यक्षपद कोकणाला मिळाल्यामुळे या भागातील अनेक पतसंस्थांनी आणि सहकार क्षेत्रातील व्यक्तींनी ॲड. दीपक पटवर्धन यांचे अभिनंदन करत समाधान व्यक्त केले आहे.

पुणे येथील या निवड प्रक्रियेच्या वेळी आणि सत्कार प्रसंगी फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉ. शांतीलाल शिंगी, तज्ज्ञ संचालक श्री. भालेराव यांच्यासह सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.