दोडामार्ग तालुक्यातील राज्यमार्गाच्या निकृष्ट कामाची मुख्य अभियंत्यांकडून होणार पाहणी

आमदार दीपक केसरकर यांच्या तक्रारीनंतर रणजित हांडे पुढील आठवड्यात दौऱ्यावर

दोडामार्ग । प्रतिनिधी :आमदार दीपक केसरकर यांनी नुकतीच दोडामार्ग तालुक्याला भेट देऊन विविध विकासकामांची पाहणी आणि आढावा घेतला होता. या दौऱ्यादरम्यान, राज्य शासनाच्या रस्ते विकास महामंडळ (MSIDC) योजने अंतर्गत सुरू असलेल्या कोल्हापूर-नागणवाडी-चंदगड-रामघाट-दोडामार्ग-असनोडा या राज्यमार्ग क्रमांक १८९ च्या कामाची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

या पाहणी दरम्यान, दोडामार्ग तालुका आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किमी ०/१०० ते किमी ३/०० या टप्प्यात ईपीसी (EPC) मॉडेल अंतर्गत सुरू असलेल्या रस्त्याचे काम काही भागात अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचे आमदार केसरकर यांच्या निदर्शनास आले. या गंभीर बाबीची दखल घेत त्यांनी थेट मुंबई गाठली.

मुंबई येथे आमदार दीपक केसरकर यांनी ‘एमएसआयडीसी’चे मुख्य अभियंता श्री. रणजित हांडे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी दोडामार्ग तालुक्यातील संबंधित रस्ते कामाच्या निकृष्ट दर्जाबाबत सविस्तर चर्चा करून ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच यावर तातडीने योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली.

आमदार केसरकर यांच्या तक्रारीची दखल घेत, मुख्य अभियंता श्री. रणजित हांडे यांनी पुढील आठवड्यात या भागाचा प्रत्यक्ष दौरा करण्याचे आश्वासन दिले आहे. या दौऱ्यात ते तक्रारीच्या अनुषंगाने रस्ते कामाची प्रत्यक्ष पाहणी करून योग्य ती उचित कारवाई करणार आहेत. मुख्य अभियंत्यांच्या या आगामी दौऱ्यामुळे निकृष्ट काम करणाऱ्या घटकांचे धाबे दणाणले आहेत.